|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि.प.तील बॅनर घोटाळय़ाची होणार चौकशी

जि.प.तील बॅनर घोटाळय़ाची होणार चौकशी 

शिवसेना सदस्यांची आक्रमक भूमिका : प्रशासनाकडून ‘बॅनरबाजी’ची कबुली : चौकशी अधिकारी नियुक्त करणार

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जि. प. अंतर्गत स्वच्छतेविषयी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी भिंतींवर पेंटिंग करायचे असताना डिजीटल बॅनरबाजी करण्यात आली आणि लाखो रुपयांचा बॅनर घोटाळा झाल्याचे जि. प. सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी उघड झाले. या घोटाळय़ाबाबत शिवसेना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी करताच अधिकारी नेमून चौकशी करण्यात येत असल्याचे जि. प. प्रशासनाने स्पष्ट केले.

जि. प. ची सर्वसाधारण सभा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये झाली. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालविकास सभापती पल्लवी राऊळ, जि. प. सदस्य प्रदीप नारकर, अमरसेन सावंत, उत्तम पांढरे, दादा कुबल, रेश्मा सावंत, बाळा जठार, संजय देसाई आदी सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

बॅनर घोटाळा चौकशीची मागणी

जि. प. च्या स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छता मोहीम राबवत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छ दर्पण ग्रामपंचायत असा फलक लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही देण्यात आला. हे फलक भिंतीवर पेंटिंग करून लावावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र पंचायत समिती स्तरावरून याची अंमलबजावणी करताना भिंतीवर पेंटिंग न करता डिजीटल बॅनर तयार करून लावण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या बॅनरची किंमत चार ते साडेचार हजार होईल, त्याची किंमत नऊ ते 10 हजार रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे दुप्पट किंमत दाखवून लाखो रुपये काढले गेल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य प्रदीप नारकर व अमरसेन सावंत यांनी उपस्थित केला व बॅनर घोटाळय़ाची चौकशी करण्याची मागणी केली.

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱयांची कबुली

शिवसेना सदस्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भितींवर पेंटिंग करून फलक लावायचे असताना बॅनरबाजी करण्यात आली, ही वस्तुस्थिती असल्याचे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी मान्य केले व या संदर्भात चौकशी अधिकारी नेमून चौकशी करण्यात येत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जाणून तालुकास्तरावरून चौकशी केली जाणार आहे, असे स्पष्ट केले.

पाणीपुरवठा समित्यांवर फौजदारी कारवाई

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ातील काही ग्राम पाणीपुरवठा समित्यांनी कामे पूर्ण न करता अर्धवट ठेवली आणि रक्कम मात्र पूर्ण काढली गेल्याचे उघड झाल्याने कामे न करता आगावू रक्कम काढणाऱया पाणीपुरवठा समित्यांवर फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱयांकडून देण्यात आली.

रस्त्यावरील खड्डे भरलेच नाहीत

जिल्हय़ातील रस्त्यांवरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी भरणार असल्याचे सांगितले होते. मात्र बहुतांश रस्त्यावरील खड्डे भरलेच नसल्याचे सांगत तळेरे-वैभववाडी रोड, तळेरे-विजयदुर्ग या दोन रस्त्यांची उदाहरणे देण्यात आली. एक-दोन खड्डे भरण्याचे नाटक करून मलमपट्टी करण्यात आली. त्यातूनच लाखो रुपये काढले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

अनुपस्थित अधिकाऱयाबद्दल नाराजी

वीज महावितरण कंपनी, जिल्हा चिकित्सक असे प्रमुख अधिकारी सभेला अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही प्रश्न मांडतो, पण अधिकारी येत नाहीत आणि उत्तरेही देत नाहीत, अशी खंत व्यक्त करण्यात आली. त्यानंतर संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांना कळविण्यात येईल, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

निम्म्या सदस्यांची सभेला दांडी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. जि. प. सदस्य सतीश सावंत आणि रणजित देसाई हे तर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सतीश सावंत यांनी तर राजीनामाही दिला आहे. मात्र अन्य सदस्यांनीही निवडणुकीच्या प्रचाराला पसंती देत जि. प. सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली. एकूण 50 जि. प. सदस्य आहेत. त्यातील सावंत यांनी राजीनामा दिला आहे. उर्वरित 49 सदस्यांपैकी 25 सदस्य सभेला उपस्थित होते. 24 सदस्य अनुपस्थित होते.