|Thursday, February 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग उद्या भारत दौऱयावर

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग उद्या भारत दौऱयावर 

दुसऱया अनौपचारिक बैठकीचे महाबलीपुरम येथे आयोजन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे शुक्रवार 11 व शनिवार 12 रोजी भारत दौऱयावर येत आहेत. भारत-चायना द्विपक्षीय शिखर अनौपचारिक परिषदेतील ही दुसरी बैठक आहे. याआधी चीनमधील वुहान येथे 27 व 28 एप्रिल रोजी अशी अनौपचारिक बैठक घेण्यात आली. डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीतून अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या होत्या.

सीमाप्रश्न, सुलभ व्यापारावर चर्चा शक्य

शुक्रवारच्या बैठकीमध्ये काश्मीर, लडाख तसेच सीमाप्रश्नी आणि सुलभ व्यापार पद्धतीविषयी चर्चा  होण्याची शक्यता चीनचे राजदूत सून वेईडांग यांनी व्यक्त केली आहे. तामिळनाडूजवळील महाबुलीपुरम येथे होणाऱया या दुसऱया अनौपचारिक द्विपक्षीय शिखर परिषदेमध्ये वैश्विक मुद्यांवरही चर्चाहोण्याची शक्यता आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या परिषदेसंदर्भात ट्विट केले आहे. ही परिषद महत्त्वपूर्ण असली तरीही यामध्ये कोणत्याही करारांवर स्वाक्षऱया केल्या जाणार नाहीत. बैठकीमध्ये भारत-चीनमधील सीमाप्रश्नावर मार्ग सुचवणे आणि तश्या पद्धतीने पुढील अधिक प्रगतीकारक योजनेची आखणी करणे हे उद्दीष्ट असू शकते. त्याशिवाय दोन्ही देशांतील सुलभ व्यापार पद्धतीवरही मुक्त चर्चा केली जाणार आहे. व्यापारातील तोटा कमी करण्याकरता चीनाला अधिक भारतीय उत्पादनांची निर्यात करण्याबद्दलही चर्चा होऊ शकते. तथापि ही बैठक अनौपचारिक असल्याने कोणत्याही प्रकारचे करारमदार व स्वाक्षऱया केल्या जाणार नाहीत.

केंद्रशासित लडाखवर चीनचा आक्षेप

याआधी अशाप्रकारची अनौपचारिक द्विपक्षीय शिखर परिषद चीनमधील वुहान येथे झाली होती. त्यावेळी डोकलामवरुन या देशांमध्ये तणाव होता. चर्चा विविध विषयांवर झाली असली तरी त्यामध्ये कोणतेही करार अथवा स्वाक्षऱया केल्या नव्हत्या. तर या बैठकीवेळी काश्मीरचे 370 कलम रद्द करण्यावरुन काहीसा तणाव निर्माण झाला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यावरुन चीनने नाराजी व्यक्त केली होती. तथापि भारताने हा मुद्दा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून चीनचे आरोप फेटाळले होते. त्यामुळे यावेळच्या परिषदेवर 370 कलम आणि केंद्रशासित लडाख या दोन विषयांचे सावट आहे.

शांतता, स्थैर्यासाठी संयुक्त कार्यक्रमाची गरज

दरम्यान चीनचे राजदूत सून वेईडांग यांनी मात्र दोन्ही देशांमधील क्षेत्रीयस्तरावर संवाद व चर्चा होण्याला प्राधान्य दर्शवले आहे. सर्व प्रश्न शांततापूर्ण चर्चेतून सोडवण्याची गरज आहे. दोन्ही देशांनी संयुक्तपणे शांतता आणि स्थैर्य यासाठी ठोस निर्णय घेत इरादे बुलंद करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. रणनैतिक आणि राजनैतिक विश्वास वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याकरता दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या सहमतीने संयुक्त ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असे म्हटले आहे.

Related posts: