|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » केंद्रीय कर्मचाऱयांची दिवाळीआधीच ‘चांदी’

केंद्रीय कर्मचाऱयांची दिवाळीआधीच ‘चांदी’ 

महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ : 50 लाख कर्मचारी, 66 लाख निवृत्तांना होणार लाभ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला आहे. याचा लाभ 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त कर्मचाऱयांना होणार आहे. या निर्णयामुळे एकंदर महागाई भत्ता पायाभूत वेतनाच्या किंवा पायाभूत निवृत्तीवेतनाच्या 17 टक्के इतका झाला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढीव भत्ता 1 जुलै 2019 पासून लागू होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या सूचनांच्या आधारावर ही भत्तावाढ देण्यात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले. एका वेळी देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी महागाई भत्ता वाढ आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या वाढीमुळे केंद्रीय कोषागारावर वार्षिक 15,909.35 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. तसेच यंदाच्या, अर्थात 2019-2010 या आर्थिक वर्षात हा भार 10,606.20 कोटी रुपयांचा असेल. याशिवाय केंद्रीय कोषागारावर आणखी 8,590.20 कोटी रुपयांचा भारही पडणार असल्याचे सांगण्यात आले.

निवृत्तीवेतनावरील भत्तावाढीमुळे (डीआर) कोषागारावर अतिरिक्त 7 हजार 319.15 कोटी रुपयांचा भार पडणार असून यंदाच्या आर्थिक वर्षाच्या आठ उर्वरित महिन्यांसाठी तो 4,870 कोटी रुपयांचा असेल. महागाई भत्ता 1 जानेवारी आणि 1 जुलै असा एक वर्षात दोनदा देण्यात येतो.  

30 नोव्हेंबर पर्यंत कालावधीवाढ…

शेतकऱयांच्या खात्यात प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये जमा करण्याच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या आधार कार्ड जोडणीसाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत कालावधीवाढ देण्यात आली आहे. हा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. देशातील 14 कोटी शेतकऱयांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचे ‘सन्मान धन’ देण्याची ही योजना गेल्यावर्षीपासून लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याची आधार कार्डाशी जोडणी करणे आवश्यक आहे. गेल्या 1 ऑगस्टपासून आधार जोडणी अनिर्वाय बनविण्यात आली आहे. मात्र आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना अशा जोडणीतून मुक्तता देण्यात आली आहे. या योजनेसाठी सरकारला वार्षिक 87 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी यावर्षी 27 हजार कोटी रुपये यापूर्वीच वितरीत करण्यात आले आहेत.  

भत्तावाढ आणि परिणाम…

ड केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात वाढ 5 टक्के

ड भत्त्याचे प्रमाण आता पायाभूत वेतनाच्या 17 टक्के

ड निवृत्त कर्मचाऱयांनाही महागाई भत्तावाढ आहे 5 टक्के

ड केंद्रीय कोषागारावर 15 हजार 909 कोटींचा भार

ड निवृत्ती वेतनावरील भत्तावाढीमुळे भार 7 हजार 319 कोटी

ड सातव्या वेतन आयोगाच्या सूचनांच्या आधारावर निर्णय

Related posts: