|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » जुआन काबाल-रॉबर्ट फराह यांना दुहेरीचे अग्रमानांकन

जुआन काबाल-रॉबर्ट फराह यांना दुहेरीचे अग्रमानांकन 

वृत्तसंस्था/ लंडन

कोलंबियाची दुहेरीची जोडी जुआन सेबॅस्टियन काबाल व रॉबर्ट फराह यांनी एटीपी दुहेरी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले असून वर्षअखेरपर्यंत ते याच स्थानावर राहणार आहेत. वर्षअखेरचे अग्रस्थान पटकावणारी दक्षिण अमेरिकेची ही आजवरची दुसरी जोडी आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय मास्टर्स स्पर्धेत या जोडीने अमेरिकेच्या जॉन इस्नेर व सॅम क्वेरी या जोडीवर मात करीत वर्षअखेरचे अग्रमानांकनही निश्चित केले. वर्षअखेरपर्यंत दुसरी कोणतीही जोडी त्यांना मागे टाकू शकणार नाही, इतके त्यांनी जवळच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. यापूर्वी चिलीच्या हान्स गिल्डेमीस्टर व इक्वेडोरचा आंद्रेस गोमेझ या दक्षिण अमेरिकन जोडीलाच 1986 मध्ये अग्रस्थान मिळविता आले होते. 1984 पासून दुहेरीचे मानांकन देण्यास सुरुवात झाली होती. काबाल व फराह यांनी यावर्षी विम्बल्डन व अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. याशिवाय बार्सिलोना, रोम व ईस्टबोर्न येथील स्पर्धाही त्यांनी जिंकल्याआहेत. या यशाचा अभिमान वाटत असल्याचे दोघांनीही सांगितले. दीर्घकाळापासून बाळगलेले स्वप्न साकार झाल्याच्या भावना रॉबर्ट फराहने व्यक्त केल्या. 2016 मध्ये ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेसने ब्रिटनच्या जेमी मरेसमवेत तर ब्राझीलच्याच मार्सेलो मेलोने लुकास क्युबोटसमवेत 2017 मध्ये अग्रस्थान पटकावले होते.