|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची नेपाळवर एकतर्फी मात

भारताची नेपाळवर एकतर्फी मात 

सॅफ यू-15 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप : लींडा कोमचे दोन गोल

वृत्तसंस्था / थिम्फू, भूतान

सॅफ यू-15 महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने नेपाळचा 4-1 असा पराभव करून विजयी सुरुवात केली.

भारतातर्फे स्ट्रायकर लींडा कोम सेर्तोने 38 व 56 व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर विंगर सुमती कुमारीने सातव्या मिनिटाला एक गोल नोंदवला आणि एक गोल नोंदवण्यासाठी मदत केली. प्रियांका सुजीशने 66 व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल नोंदवला. मन माया दमाइने 62 व्या मिनिटाला नेपाळचा एकमेव गोल नोंदवला.

भारतीय मुलींनी आक्रमक सुरुवात करीत नेपाळचा बचाव भेदत सातव्याच मिनिटाला पहिला गोल नोंदवला. नेपाळ डिफेन्सच्या मागून थ्रू पास मिळाल्यावर सुमती कुमारीने त्यावर ताबा मिळवित हा गोल नोंदवला. 38 व्या मिनिटाला भारताने ही आघाडी दुप्पट केली. यावेळी सुमतीने लींडाला चेंडू पुरविला होता. उत्तरार्धातही भारताने जोरदार खेळ चालूच ठेवला होता. लींडाने भारताचा तिसारा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून आघाडी वाढविली. यावेळीही सुमतीनेच तिला चेंडू पुरविला. 62 व्या मिनिटाला नेपाळला एकमेव यश मिळाले. मन माया दमाइने हा गोल नोंदवला. पण चारच मिनिटांनी सई सांखेइने प्रियांकाला चेंडू पुरविला आणि त्यावर गोल नोंदवून भारताची आघाडी 4-1 अशी केली आणि उर्वरित वेळेत आघाडी कायम ठेवत भारताने पहिला विजय नोंदवला.

‘पहिला सामना नेहमीच कठीण असता. पण आमच्या खेळाडूंनी चांगले पासिंग करीत अनेक संधीही निर्माण केल्या. मात्र याहून सरस खेळ आपला संघ करू शकतो,’ असे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक ऍलेक्स ऍम्ब्रोस सामन्यानंतर म्हणाले. ‘या मुली अद्याप शिकण्याच्या टप्प्यात असून चुकातून त्या शिकत जातील आणि प्रत्येक सामन्यागणिक त्यांच्यात सुधारणा होत जाईल,’ असेही ते म्हणाले. भारताचा पुढींल सामना यजमान भूतानशी शुक्रवारी होणार आहे.