|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » रांचीत आजपासून राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धा

रांचीत आजपासून राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धा 

नीरज चोप्रा मुख्य आकर्षण केंद्र, मोहम्मद अनास याहिया, अनू रानी, दुती चंदचाही सहभाग

रांची / वृत्तसंस्था

59 व्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत असून तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर पुनरागमन करत असणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा येथे मुख्य आकर्षण केंद्र ठरेल, असे संकेत आहेत. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा व जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया नीरजने गतवर्षी 19 सप्टेंबर रोजी जलहळ्ळी येथे शेवटचे प्रतिनिधित्व नोंदवले. त्यावेळी तो लष्कराच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत उतरला होता.

गतवर्षी मे महिन्यात त्याला खांद्याची दुखापत असल्याचे निदर्शनास आले. 21 वर्षीय नीरज त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतील पोचफस्ट्रूम येथे सराव करत होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला अवघ्या 10 महिन्यांचा कालावधी बाकी असताना नीरजला अर्थातच आपला फॉर्म सिद्ध करावा लागेल.

‘मला आता प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे आणि या हंगामातील ही शेवटची स्पर्धा असल्याने स्वतःला आजमावून देखील पहायचे आहे. मी माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली असून त्यांनी मला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला आहे. काही आठवडय़ांपूर्वी मी पतियाळात सरावाला सुरुवात केली आणि सध्या सरावात मला उत्तम सूर गवसल्याचे जाणवत आहे’, असे नीरज आपल्या वाटचालीबद्दल म्हणाला.

या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय ऍथलिटस्ना दमदार प्रदर्शन साकारत उत्तम गुण संपादन करण्याची संधी तर असेलच आणि त्याही शिवाय आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशन संघटनेच्या सक्त पात्रता निकषासमोर आपण कुठे आहोत, हे देखील तपासून पाहता येईल. या स्पर्धेत नीरजशिवाय, मोहम्मद अनास याहिया, व्हीके विस्मया, लांब उडीतील श्रीशंकर, मेट्रिक मायलर जिन्सन जॉन्सन, महिला भालाफेकपटू अनू राणी, धावपटू दुती चंद, तसेच गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग यांचाही समावेश आहे.

पुरुषांच्या 400 मीटर्स राष्ट्रीय विक्रमधारक मोहम्मद अनास व महिला क्वॉटर्रमिलर विस्मया हे अलीकडेच दोहा येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष व महिला 4ƒ400 रिले पथकात होते. पण, भारतीय संघ दोन्ही गटात अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. अनू राणीने मात्र त्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडत महिला भालाफेक अंतिम फेरी गाठली होती. येथेही उत्तम यशाचा तिचा प्रयत्न असणार आहे. दुतीला दोहा येथे महिलांच्या 100 मीटर्स हिटमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत त्यापेक्षा सरस कामगिरी साकारण्याचा तिचा प्रयत्न असेल.

46 ऍथलिटस्ना प्रवेश नाकारला

दरम्यान, भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने 37 पुरुष व 9 महिला, अशा 46 ऍथलिटसना प्रवेश नाकारला. या 46 ऍथलिटनी मणिपूरचे नसतानाही त्या राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली होती. आग्रा येथे अलीकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत फेडरेशनने सर्व राज्यांना असे गैरप्रकार होणार नाहीत, याची काटेकोर काळजी घेण्याची सूचना केली होती.

याशिवाय, कर्नाटकचे ऍथलिटस या स्पर्धेत एएफआयचे प्रतिनिधीत्व करतील, हे देखील स्पष्ट आहे. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने कर्नाटक ऍथलेटिक्स फेडरेशनवर सध्या निलंबनाची कारवाई केली आहे. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे राष्ट्रीय खुली स्पर्धा बेंगळूरमध्ये होणे अपेक्षित होते. पण, श्री कंठिरवा स्टेडियम उपलब्ध नसल्याची माहिती कर्नाटक संघटनेने खूपच उशिरा कळवले. त्यामुळे, त्यांच्यावर ही कारवाई केली गेली.

Related posts: