|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » जमुना, लवलिना उपांत्यपूर्व फेरीत

जमुना, लवलिना उपांत्यपूर्व फेरीत 

महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धा : भारताच्या पाच महिला शेवटच्या आठमध्ये

वृत्तसंस्था/ उलान उदे, रशिया

भारताच्या लवलिना बोर्गोहेन व पदार्पणवीर जमुना बोरो यांनी महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मेरी कोमसह एकूण पाच भारतीय महिलांनी शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले आहे.

69 किलो वजन गटात जमुना बोरोने अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित ओइदाद स्फुहवर एकतर्फी मात केली तिसऱया मानांकित लवलिनाने 54 किलो वजन गटात मोरोक्कोच्या ओयुमायमा बेल अहबिबवर 5-0 अशी एकतर्फीच मात करून आगेकूच केली. जमुनाची पुढील लढत बेलारुसच्या चौथ्या मानांकित युलिया अपानासोविचशी होणार आहे. युलिया युरोपिन कांस्यविजेती असून तिने जर्मनीच्या उर्सुला गॉटलोबला हरविले. लवलिनासमोर पोलंडच्या सहाव्या मानांकित कॅरोलिना कोझेवस्काचे आव्हान असेल. कॅरोलिनाने उझ्बेकच्या शाखनोझा युनुसोव्हाचा पराभव केला. कॅरोलिनाने या वर्षी झालेल्या युरोपियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

आसाम रायफल्समध्ये कार्यरत असलेल्या 22 वर्षीय जमुनाने संथ सुरुवात केली. पण नंतर तिने आक्रमक खेळ करीत वर्चस्व राखले. दुसऱया व तिसऱया फेरीत दोघींत चुरस रंगली होती. पण जमुनानेच त्यात सरस ठरली. तिने सरळ ठोशांचा सढळ वापर केला. तिसऱया फेरीत मात्र जमुनाने पूर्ण वर्चस्व राखत ओइदादला फारशी संधी मिळू दिली नाही. जमुनाने या वर्षीच्या इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्ण मिळविले असून 2015 युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविले होते.

54 किलो गटातील लढतीत लवलिनालाही लय सापडण्यास थोडा वेळ लागला. अहबिबला आपल्यापासून शक्य तितक्या दूर ठेवण्याचे धोरण या लढतीत अवलंबले होते. अहबिबने आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. पण लवलिनाने तिला यशस्वी होऊ दिले नाही. काही जॅब्स मारण्यात ती यशस्वी झाली तरी लवलिनाने प्रतिहल्ला करताना जास्त परिणामकारक ठोसेबाजी करीत गुण मिळविले. भारताच्या एकूण पाच महिलांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्यात सहावेळा सुवर्ण जिंकणारी तिसरी माकांनिक मेरी कोम (51 किलो गट), मंजू रानी (48 किलो गट), कविता चहल (81 किलोवरील) यांचाही समावेश आहे. कविता चहलला अजून रिगंणात उतरावे लागलेले नाही. कारण या वजन गटात कमी स्पर्धक असल्याने तिला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आले आहे.

 

Related posts: