|Friday, February 28, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत-अफ्रिकेदरम्यान आजपासून दुसरी कसोटी

भारत-अफ्रिकेदरम्यान आजपासून दुसरी कसोटी 

पुणे / प्रतिनिधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गांधी-मंडेला मालिकेतील दुसऱया कसोटी सामन्याला गुरुवारपासून एमसीएच्या गहुंजे मैदानावर सुरुवात होत असून, दोन्ही संघांमध्ये क्रिकेटवॉर पहायला मिळणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचे पारडे जड असून, आफ्रिकेपुढे मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान राहणार आहे.

विखाशापट्टणमधील पहिल्या सामन्यात बाजी मारलेल्या टीम इंडियाची फलंदाजी सध्या ऐन भरात आहे. रोहित शर्मा, मयांक अगरवाल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे अशी मजबूत फळी टीम इंडियाकडे असून, त्यावरच संघाची मुख्य मदार असेल. पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्माने दोन्ही डावात शतके फटकावत आपल्या फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना पेश केला. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे मयांक आगरवालनेही द्विशतक झळकावत आपले स्थान पक्के केले आहे.

अश्विन आणि जडेजाही फलंदाजी करू शकतात. त्यामुळे भारताची फलंदाजी खोलवर आहे. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीही भेदक आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अशी गोलंदाजांची फौज आहे. पहिल्या कसोटीत अश्विन आणि जडेजाने आपल्या फिरकीच्या तालावर आफ्रिकेच्या फलंदाजांना नाचवले होते. तसेच शमीच्या रिव्हर्स स्विंगनेही आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते.

एकीकडे भारताचा संघ फॉर्ममध्ये असताना आफ्रिकेला मात्र झगडावे लागत आहे. आफ्रिकेची फलंदाजी फॅफ डु प्लेसिस, मार्करम, डीकॉक, डीन एल्गार यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. मुथुसामीनेही दोन्ही डावात चिवट फलंदाजी केली. त्याचबरोबर विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. गोलंदाजीमध्ये केशव महाराज, कॅगिसो रबाडा, एन्गिडी यांच्यासारख्या गोलंदाजांची फळी आहे.

रोहितला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या : विराट कोहली

रोहितला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या, असे मत कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत व्यक्त केले. रोहित दुसऱया सामन्यात कशा प्रकारची खेळी करेल, असे विचारले असता विराटने, काही काळासाठी रोहितला एकटे सोडा. तुम्हाला माहीत आहे, तो चांगला खेळत आहे. त्याला आपल्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या. तो कसा खेळणार आहे, याकडे लक्ष देणे बंद करा, असा सल्ला त्याने दिला.

कसोटी संघात अंतिम अकरा जणांमध्ये कुलदीप यादवला स्थान मिळालेले नाही आणि त्यामागचे कारण त्यालाही ठाऊक आहे, असे स्पष्ट करताना शमीने स्वत:हून जबाबदारी स्वीकारली आहे. त्याला याहून अधिक सांगण्याची गरज वाटत नाही. आता या सत्रात गोलंदाजी करायची आहे, असे त्याला सांगावे लागत नाही. संघाला आवश्यकता असते त्या वेळी तो स्वत:हून गोलंदाजीसाठी येतो. सपाट आणि निर्जीव खेळपट्टीवरही चेंडू स्विंग करण्याच्या कलेमुळे तो खास आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कठीण परिस्थितीतही तो आपली कामगिरी चोखपणे पार पाडतो, अशा शब्दांत त्याने शमीचे कौतुक केले.

भारतीय संघात लवचिकता

गेल्या काही वर्षांत भारतीय संघव्यवस्थापनाने कसोटी सामन्यांसाठी अनेकदा नियोजनात बदल केले आहेत. याबाबत विराटला विचारले असता, तुम्ही आतापर्यंतचे निकाल पाहिले असतील तर त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून जे बदल करत आहोत, त्याबाबत खूप चर्चा होत असते. अधिकाधिक सामने कसे जिंकता येतील, यावर आमचा भर असतो. त्यात आम्ही यशस्वीही ठरत आहोत, याकडे लक्ष वेधत गेल्या तीन वर्षांत आम्ही खूप कमी सामन्यांमध्ये पराभूत झालो आहोत. संघात लवचिकता आहे. संघाने साथ दिली नाही, तर हे शक्मय होणार नाही, असेही त्याने सांगितले.

पावसाचे सावट, खेळपट्टीकडेही लक्ष

मागच्या काही दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस होत आहे. बुधवारी पुणे व परिसराला पावसाने झोडपले. परतीच्या पावसाचा प्रवासही सुरू झाला असून, या सामन्यावर पावसाचे सावट राहणार आहे. दरम्यान, मागील वेळी भारत व ऑस्ट्रलिया यांच्यातील सामन्यावरून खेळपट्टीवर टीका झाली होती. अडीच दिवसांतच सामन्याचा निकाल लागल्याने चाहत्यांचा विरस झाला होता. या पार्श्वभूमीवर हा सामना किती दिवस चालणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Related posts: