|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जोतिबावर सीमोल्लंघन सोहळा

जोतिबावर सीमोल्लंघन सोहळा 

वार्ताहर/ जोतिबा डोंगर

श्री तीर्थक्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथील दख्खननगरीत नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमी दिवशी मंगळवारी सायंकाळी दक्षिण दरवाजाकडे प्रतीकात्मक यमघंटा (निशिगंध) राक्षसाचा वध केल्यानंतर सोने लुटून करण्यात आली. यावेळी श्रीस महाभिषेक, अलंकारीक महापूजा, पालखी सोहळा, धुपारतीसोहळा, तोफेच्या असंख्य सलामी, भव्य शाही मिरवणूक, राक्षसवध, सोने लुटणे, याप्रसंगी श्रीचरणी परंपरेनुसार दर्शनसोहळा संपन्न झाला.

दख्खनच्या राजाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात हजारो भाविक व वाडीरत्नागिरी येथील संपूर्ण गावातील ग्रामस्थ, पुजारी, महिला व अबालवृध्द शारदीय नवरात्र उत्सवातील विजयादशमी दिवशी श्रींचे दर्शन व डोळय़ांची पारणे फेडणारा आगळावेगळा शाही सोहळा जणू देवदेतांचा राजदरबार भरावा तसा विजयी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. दख्खन नगरीत दिवाळीपेक्षा दसरा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या दसरा उत्सवाची केदारविजय ग्रंथात नमूद आहे.

विजयादशमीनिमित्त श्री जोतिबा देवाची हत्तीवरील अंबारीतील आकर्षक सुवर्णलंकारीक महापूजा बांधण्यात आली होती. ही पूजा नेताजी दादर्णे, हरिदास सातार्डेकर, केदार दादर्णे, विनोद मिटके, दिलीप दादर्णे, अमर नवाळे, महादेव झुगर, दगडू भंडारे यांनी बांधली होती. तर नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, दत्त, रामलिंग या देवाची महापूजा दहा गावकर प्रतिनिधी व खंडकरी पुजारी यांनी बांधली होती.

यावेळी श्रींच्या मंदिरात केदारकवच, केदारस्त्रोत्र व केदार महिमा या सुक्तांचे पठण, सुरज उपाध्ये, केरबा उपाध्ये, गणेश उपाध्ये, बंडा उमराणी, प्रकाश उपाध्ये यांनी केली.

सायंकाळी 5 वाजता जोतिबाची पालखी हार, फुल, नवीन वस्त्र, रोषणाईसह मंदिरातून विजयादशमी सोहळय़ासाठी बाहेर पडली. यावेळी उंट, घोडा, श्रींचे पुजारी, वाजंत्री, कंचाळवादक, ढोली, डवरी, हुद्देवाले, देवसेवक, म्हालदार, चोपदार, देवस्थान समिती अधिकारी महादेव दिंडे व कर्मचारी, सिंधीया ग्वाल्हेर देवस्थान समितीचे आर. टी. कदम व त्यांचे कर्मचारी शाही पोशाखात माजी मंत्री डॉ. विनय कोरे, जोतिबा सरपंच राधा बुणे, सदस्य लखन लादे, सुनील नवाळे, माजी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, संतोष शिंगे, तुषार झुगर, कोडोली पोलीस स्टेशनचे स. पो. नि. सुरेश बनसोडे व त्यांच्या कर्मचारी स्टाफ भगवे फेटे बांधून तसेच गावातील सर्वच ग्रामस्थ, पुजारी, महिला, अबालवृध्द व भक्तगण हा लवाजमा सोहळय़ात सहभागी झाले होते.

यावेळी यमघंटा राक्षसाचा वध करण्यात आला. यावेळी चांगभलंचा जल्लोष झाला. तोफांच्या सलामी उडू लागल्या. त्यानंतर पालखी दक्षिण दरवाजातून जोतिबा मंदिराकडे आली. यावेळी सुवासिनींनी वाटेत ठिकठिकाणी पालखीचे पंचारती ओवाळून, पाणी घालून स्वागत केले. त्यानंतर पालखी सदरेवर बसवून धार्मिक विधी, ढोली यांचे झुलवे, डवरी गीते, मानपान सोहळा, म्हालदारी ललकारी व तोफेची सलामी झाल्यानंतर हा पालखी सोहळा मंडपात आला व उत्सवमूर्ती श्रींच्या मंदिरात नेण्यात आली.