|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला 

पाचगाव-गिरगाव मार्गावरील भरदिवसा प्रकार

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राजारामपूरीतील खासगी सावकाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकावर आर्थिक कारणातून भरदिवसा खूनी हल्ला केला. पाचगाव-गिरगाव मार्गावरील ओमकारनगरातील बोर्डानजीक बुधवारी दुपारी घडला. कृष्णा नाना लाड (वय 59 मुळ रा. चरण ता. शाहुवाडी सध्या रा. पांचाली अपार्टमेंट, अंबाई टँक रंकाळा परिसर) असे जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी खासगी सावकार सुभाष रामचंद्र दुर्गे (मूळ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, सध्या रा. राजारामपूरी, कोल्हापूर) याच्यासह तिघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : बांधकाम व्यावसायिक कृष्णा लाड यांनी खासगी सावकार सुभाष दुर्गे यांच्याकडून व्यवसायाकरीता 2012 पासून वेळोवेळी 50 लाख रुपये व्याजाने घेतले होते. लाड यांनी दुर्गेला सुमारे दीड कोटी रुपये मुद्दल व व्याजापोटी दिले आहेत. तरीदेखील दुर्गेकडून उर्वरीत मुद्दल व व्याजाच्या कारणावरुन लाड यांना त्रास देणे सुरू होते. त्यांनी जुना राजवाडा पोलिसांत  फिर्यादही दिली होती. त्यावरुन पोलिसांनी दुर्गेविरोधी खासगी सावकारीच्या गुन्हा दाखल केला होता. यानंतरही दुर्गेने पैशाच्या वसुलीवरुन लाड यांना व त्याच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता.

  कृष्णा लाड हे एका राजकीय पक्षाचे व लोकप्रतिनिधींचे समर्थक आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते संबंधित लोकप्रतिनिधीच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. सोमवारी दुपारी त्यांना दुर्गेने मोबाईल नंबरवरून फोन केला. ‘मी आकाराम पाटील बोलत असल्याचे सांगून, चरण (ता. शाहुवाडी) येथील अकरा मतदार आहेत. त्याच्या मतदानाबाबत चर्चा करण्याचे आहे. पाचगाव येथील कमानी जवळ या’, असे सांगितले. लाड दुचाकीवरुन ठरलेल्या ठिकाणी जावून थांबले.  सावकार दुर्गे आपल्या कारमधून येत असल्याचे लाडने पाहिले. धोका ओळखून ते दुचाकीवरून  पाचगावकडे जाणाऱया रस्त्याने जावू लागले. त्यावेळी खासगी सावकाराने मोटरसायकलवरुन तोंड बांधून आलेल्या आपल्या समर्थक मारेकऱयांना सशस्त्र हल्ला करण्याबाबत इशारा केला. मोटरसायकलवरुन आलेल्या दोघा हल्ल्sखोरांनी लाड यांच्यावर सत्तुराने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हातावर  वार करण्यात आले. जखमी झालेल्या कृष्णा लाड यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री करवीर पोलिसात खासगी सावकार दुर्गेसह त्याच्या अज्ञात दोघा साथिदाराविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.

मतदार असल्याची बतावणी

सोमवारी दुपारी कृष्णा लाड यांना आकाराम नावाच्या एका व्यक्तिचा फोन आला. त्याने माझ्या घरी 11 मतदान असल्याचे सांगितले. यातूनच लाड संबंधिताला भेटण्यास तयार झाले. मात्र सुभाष दुर्गे यानेच मतदार असल्याची बतावणी करून हा प्रकार केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली.

चौकट

दुर्गे राजकीय आश्रयाला ?

सुभाष दुर्गे यांचा खासगी सावकारीबरोबर पेट्रोल पंप चालक आहे. तसेच त्यांचे जिह्यातील एका बडय़ा राजकीय व्यक्तीबरोबर चांगलेच संबंध आहे. त्यामुळे तो लाड यांच्यावर खुनी हल्ला करुन, तो आश्रयाला राजकीय व्यक्तीकडे गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.