|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नोकरीच्या आमिषाने 16 लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने 16 लाखांची फसवणूक 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे सांगून 16 लाख 44 हजार रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा शिंगाडे (वय 59, व्यवसाय ट्रान्स्पोर्ट, काळभैरी रोड) यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. याबाबत सीमा रमेश गोसावी (रा. साई निवास, विद्यानगर, कराड, जि. सातारा) या महिलेच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी श्री. शिंगाडे व अरुण कोले (सेवानिवृत्त शिक्षक, वडरगे रोड) यांच्या ओळखीची असलेल्या सीमा गोसावी यांनी आपले नाव सुरेखा वामन फडके असे सांगितले. तसेच आपण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मेहुणी असून, रेल्वे खात्यात नोकरी लावण्यासाठी तिकीट चेकर पदासाठी 2 लाख, तिकीट मास्तर पदासाठी 1 लाख 50 हजार, शिपाई पदासाठी 1 लाख रुपये, अभियंता पदासाठी 2 लाख 50 हजार रुपये भरावे लागतील, असे आमिष दाखवले. शिंगाडे व त्यांच्या ओळखीच्या तरुण, तरुणींकडून पैसे उकळले. फसवणूक झालेल्यांमध्ये संजीवनी संतोष बागेवाडी, सायली प्रकाश मांडेकर, पद्मश्री महादेव पाटील, हर्षवर्धन मलगोंडा पाटील, पूजा प्रकाश देशपांडे, संतोष नेसरी, विनायक कल्याणी, अभिजीत नांदवडेकर, अतुल पोवार, सुमित शिंदे, नितीन शंकर माळी, अविनाश मारुती केसरकर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एप्रिल 2019 पासून ते आजअखेर रोख रक्कम 13 लाख 30 हजार रुपये उकळले आहेत. शिवाय संशयित सिमा गोसावी यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर भरलेली 3 लाख 14 हजार रुपये अशी एकूण 16 लाख 44 हजार रुपयाची फसवणूक झाली आहे. फिर्यादी शिंगाडे यांच्या फिर्यादीवरुन गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून तपास सपोनि डी. के. काशिद करीत आहेत.