|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वीज कोसळून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

वीज कोसळून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू 

दसऱयादिवशीच कोसळला दुःखाचा डोंगर

वार्ताहर/ ताम्हाने

दसऱयाच्या दिवशी घरावर वीज कोसळून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या नांदळज गावात ही दुर्घटना घडली. सणासुदीच्या कालावधीत घडलेल्या या दुर्घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

सुशांत विश्वास कांबळे असे या दुर्घटनेचा बळी ठरलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सर्वत्र दसरा उत्सव सुरु असताना दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. कानठळय़ा बसवणाऱया विजेच्या कडकडाटाने सर्वांचीच घाबरगुंडी उडीली होती. अनेकजण आपल्या घराच्या दिशेने धाव घेवू लागले होते. याचदरम्यान दुपारी उशिरा सुशांत आपल्या घरी आला. तो जेवायला बसलेला असताना मोठा आवाज करत वीज त्याच्या घरावर कोसळली. यामध्ये सुशांत पूर्णपणे पोळून गेला आणि जागच्या जागी त्याचा मृत्यू झाला. दुर्घटनेत घरातील अन्य सदस्यही किरकोळ जखमी झाले. सुशांत याला प्राथमिक उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.

संगमेश्वर येथे सायंकाळी उशिरा त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांत हा ताम्हाने विद्यामंदिरचा विद्यार्थी असून तो इयत्ता सातवीत शिकत होता. बुधवारी सकाळी ताम्हाने शाळेच्यावतीने त्याला श्रध्दांजली वाहण्यात आली.