|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुंकवाची उधळण अन् संबळचा ठेका

कुंकवाची उधळण अन् संबळचा ठेका 

तुळजाभवानीमातेचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात 

प्रतिनिधी/ तुळजापूर

कुंकवाची उधळण, संबळाचा कडकडाट आणि ‘आई राजा उदो, उदो’च्या जयघोषात तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा मंगळवारी (दि.8) उत्साहात पार पडला.

तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा शौर्याचे प्रतीक आहे. सोहळ्यापूर्वी सोमवारी (दि.7) रात्रीपासून तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रथेनुसार खुले ठेवण्यात आले होते. नगर येथून आलेला पलंग पालखीच्या मिरवणुकीसाठी शहर रात्रभर जागे होते. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास देवीचा अभिषेक सुरू झाला. महानवमीचे रात्रीचे अभिषेक मध्यरात्री बाराच्या सुमारास करण्याची परंपरा असून दोनपर्यंत ते सुरू होते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस 108 साडय़ांचे दिंड बांधण्यास सुरूवात झाली. दरम्यान, मंदिर संस्थानतर्फे पालखी आणि पलंगास सीमोल्लंघनासाठी शुक्रवारपेठेतील पालखीच्या स्थळाजवळ जाऊन निमंत्रण देण्यात आले.

सीमोल्लंघन सोहळ्यात अग्रभागी सुमारे 125 गोंधळी संबळाचा कडकडाट करीत होते. मायमोरताब हातामध्ये घेऊन परंपरेने पालखी मंदिरात आणली. पलंग-पालखी घेऊन येणारे मानकरी सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे निघाले. रात्री साडेबाराला निघालेली मिरवणूक विविध मार्गांनी पहाटे चारला मंदिरात पोचली. ती सीमोल्लंघन पारावर आल्यावर पालखीमध्ये गादी, मखमली आच्छादन टाकण्यात आले. पहाटे साडेपाचच्या सुमारास धुपारती झाली. त्यानंतर गाभाऱयातून प्रत्यक्ष मूर्ती कडीच्या दरवाज्यातून बाहेर आणण्यात आली. पालखीमध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती बसवून प्रदक्षिणा झाली. सीमोल्लंघन पारावर पालखी आल्यानंतर विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवून ओवाळणी झाली. त्यानंतर मूर्ती पालखीतून सिंहाच्या गाभाऱयात घेऊन गेल्यानंतर तेथे देवीचे दिंड काढण्यात आले. अश्विन शुद्ध दशमीचे चरणतीर्थ झाले. सीमोल्लंघनानंतर पालखी मानकऱयांचा मंदिर समितीच्या अध्यक्ष व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंहत तुकोजीबुवा, मंहत चिलोजीबुवा, मंहत हमरोजी बुवा, मंहत वाकोजी बुवा, पाळीचे भोपे पुजारी शुभम बाबासाहेब पाटील श्री तुळजाभवानी मंदिरसंस्थान अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दिपा मुधळ-मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, प्रशासकीय तहसीलदार सौदागर तांदळे, प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार योगीता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, आदींसह भोपे, पुजारी, सेवेदार मानकरी व भाविक मोठय़ा संख्येने  उपस्थित होते. मंदिरात आणलेली पालखी सीमोल्लंघनानंतर होमकुंडात अर्पण करण्यात आली. 

 दूध, पेंड-भाकरीचा नैवेद्य

तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनात कुंकू-हळद, पुष्प पाकळ्यांची उधळण करण्यात आली. मंदिरात पहाटे पाचला आरतीचे आणि नैवेद्याचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. दीक्षित घराण्याच्या वतीने दुधाचा नैवेद्य सीमोल्लंघनानंतर दाखविण्यात आला. राजाभाऊ गायकवाड गोंधळी यांच्यासह गोंधळी मंडळींनी संबळ रणवाद्याने पालखी मिरवणूक, सीमोल्लंघनात सहभाग नोंदविला. पेंड भाकरीचा नैवेद्यही भगत कुटुंबियांच्या वतीने सकाळी दाखविण्यात आला.

 

Related posts: