|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडात 21 गुन्हेगारांना ‘मोक्का’

कराडात 21 गुन्हेगारांना ‘मोक्का’ 

जुनेद शेख टोळीसह मटकाकिंग अल्ताफ पठाणचा  समावेश, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांची माहिती

प्रतिनिधी/ कराड

कराड शहरासह परिसरातील गुंडगिरी संपवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून त्याचा पहिला दणका गुंड जुनेद शेख टोळीला व मटकाकिंग अल्ताफ पठाण यांना बसला आहे. टोळी युद्धातून झालेल्या पवन सोळवंडे खून प्रकरणातील तब्बल 21 संशयितांच्या टोळीवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. कराड पोलिसांनी पाठवलेला ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूर केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

  दरम्यान, ‘मोक्का’ कारवाईच्या तपासात टोळीतील संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता उपअधीक्षक सुरज गुरव यांनी व्यक्त केली. जुनेद फारूख शेख (वय 30 रा. शिवाजीनगर, मलकापूर), समीर इस्माईल मुजावर (वय 30 रा. सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर), शिवराज सुरेश इंगवले (वय 24 रा. लाहोटीनगर, मलकापूर), अल्ताफ राजेखान पठाण (वय 50 रा. मंगळवार पेठ), निहाल अल्ताफ पठाण (वय 24 रा. मंगळवार पेठ), मजहर बद्रुद्दीन परिजादे (वय 28 रा. अहिल्यानगर, मलकापूर), हैदर महिबूब मुल्ला (वय 26 रा. मुजावर कॉलनी, शनिवारपेठ), पितांबर ऊर्फ पप्पू विश्वास काटे (वय 26 रा. बैलबाजार रोड, मलकापूर), सिकंदर बाबू शेख (वय 29 रा. विंग), प्रमोद ऊर्फ आप्पा तुकाराम जाधव (वय 37 रा. पंचमुखी निवास, साईनगर), निरज आनंदराव पानके (वय 26 रा. शिवराज कॉलनी, कोयना वसाहत), अक्षय ऊर्फ महादेव संजय मोकाशी (वय 25 रा. बागलवस्ती, आगाशिवनगर), दिवाकर ऊर्फ गोंडय़ा बाबूराव गाडे (वय 27 साईनगर, मलकापूर), विजय बिरू पुजारी (वय 20 रा. यशवंतनगर, मलकापूर), सोहेल राजूभाई मुलाणी (वय 28 ज्ञानदीप कॉलनी, मलकापूर), अकीब लियाकत पठाण (वय 19 रा. मलकापूर), अक्षय साहेबराव धुमाळ (वय 21 रा. मलकापूर), सॅम ऊर्फ समीर नुरमहम्मद मोमीन (रा. मुजावर कॉलनी), अल्फाद कासिम शेख (रा. मलकापूर), आयुब बेली (रा. मलकापूर) अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे सर्व संशयित कराड, मलकापूर परिसरातील आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन दीपक सोळवंडे याचा 21 ऑगस्ट 2019 रोजी गोळय़ा घालून खून करण्यात आला होता. गुन्हेगारी टोळय़ांच्या संघर्षातून सोळवंडेचा गेम जुनेद शेख, अल्ताफ पठाण, शिवराज इंगवले टोळीने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी तपास करून संशयितांना गजाआड केले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी गुन्हेगारांना मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू केल्या. मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला डॉ. वारके यांनी नुकतीच मंजुरी दिली. मोक्का कारवाईचा तपास पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव करत आहेत.

 

Related posts: