|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आपत्कालीन प्रतिसाद आधार प्रणाली कार्यरत

आपत्कालीन प्रतिसाद आधार प्रणाली कार्यरत 

पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिका सेवांसाठी यापुढे 112 हा एकच क्रमांक

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात आपत्कालीन प्रतिसाद आधार प्रणाली (एमर्जन्सी रिसपॉन्स सपोर्ट सिस्टीम) म्हणजेच 112 क्रमांकाची हेल्पलाईन कार्यरत झाली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचा शुभारंभ केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. पणजी येथील पोलीस नियंत्रण कक्षात हा कार्यक्रम झाला. पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या तिन्ही आपत्कालीन सेवा आता 112 या एकाच क्रमांकावर मिळणार आहेत.

या आधी पोलीस 100, अग्निशामक 101, रुग्णवाहिका 108 असे क्रमांक हेल्पलाईनसाठी कार्यरत होते. ते तिन्ही क्रमांक आता 112 अंतर्गत समाविष्ट झाले असून त्या तिन्ही क्रमांकावर फोन केल्यास तो 112 क्रमांकालाच जाणार आहे. मराठी, कोकणी, इंग्रजी अशा तीन भाषेतून ही सेवा सुरु करण्यात आली असून त्यासाठी पणजी येथील पोलीस नियंत्रण कक्षात वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा समन्वय केंद्र म्हणून दक्षिण गोव्यात मडगांव येथे वेगळा नियंत्रण कक्ष सुरु झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने हा 112 क्रमांक संपूर्ण देशासाठी एकमवे लागू केला असून प्रत्येक राज्यावरील त्याची वेगळी प्रतिसाद यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. गोव्यासह प्रत्येक राज्यात आणि देशभरात कुठेही कोणी संकटात सापडला असेल किंवा आपत्ती ओढवल्यास मदतीसाठी हा 112 क्रमांक कोणतही टेलिफोन कंपनीच्या लॅण्डलाईन – मोबाईल फोनवरुन लावता येईल. त्या फोनवर पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिका या तिन्ही सेवा एकत्रत मिळणार आहेत, अशी माहिती त्यावेळी देण्यात आली.

‘112 इंडिया ऍप’ देखील या सेवेसाठी चालू करण्यात आले असून ते मोबाईलवर डाऊनलोड करुन त्याद्वारेही संपर्क करता येणे शक्य आहे. पोलीस खात्यातर्फे ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून ती आता आपल्या गोवा राज्यात सुरु झाली आहे.