|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धारगळ येथील धारेश्वर माऊलीच्या दसरोत्सवास

धारगळ येथील धारेश्वर माऊलीच्या दसरोत्सवास 

वार्ताहर/ पालये

धारगळ-पेडणे येथील श्री धारेश्वर माऊली देवस्थानातील पाच दिवसांच्या प्रसिद्ध दसरोत्सवाला प्रारंभ झाला असून हा दसरोत्सव शनिवार 12 रोजीपर्यंत चालणार आहे. मेळामेळ उत्सव व कवळास हे उत्सवातील महत्त्वाचे उत्सव असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश प्रभुदेसाई यांनी दिली.

 आज गुरुवार 10 रोजी सकाळी नित्य पूजा, दुपारी आरती, नैवेद्य, संध्याकाळी 5 वाजता तरंगाचे महाजन प्रभुदेसाई मूळ स्थानाकडे आगमन व कौलप्रसाद व तरंगाचे श्री धारेश्वर मंदिरात आगमन, सायंकाळी 7.30 वाजता जाखडी नृत्य, रात्री 8 वाजता मोहनबुवा कुंकेर यांचे कीर्तन, आरत्या व दिलीप प्रभुदेसाई पुरस्कृत महाप्रसाद भाविकांसाठी होईल.

शुक्रवार 11 रोजी सकाळी पूजा-अर्चा व तरंगांचे चोडवाडा येथील मलदेश्वर देवाच्या भेटीस जाणे, सकाळी 10 वाजता श्री वंस मंदिरासमोर महाजन वंसकर कुटुंबियांना कौल, तद्नंतर कुलकर्णी कुटुबियांना कौल, त्यानंतर तरंगांचे श्री धारेश्वर मंदिरात आगमन, दुपारी वंसकर कुटुंबियांतर्फे महानैवेद्य, सायंकाळी 7.30 वाजता जाखडी नृत्य, रात्री 8 वाजता मोहनबुवा कुकेर यांचे कीर्तन, रात्री आरती, राधाबाई प्रभुदेसाई यांच्यातर्फे महाप्रसाद होणार आहे.

 शनिवार 12 रोजी सकाळी पूजा-अर्चा, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वा. पर्यंत तरंगाची ओटी भरण्याचा कार्यक्रम, दुपारी आरती व 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ऍड. सुरेंद्र देसाई पुरस्कृत महाप्रसाद होईल. संध्याकाळी 5 वाजता चव्हाटय़ावर तळेवाडय़ावरील तरंगांचे आगमन झाल्यानंतर प्रसिद्ध मेळामेळ उत्सव होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता गोठणीवर कवळास प्रारंभ होणार असून अवसारी सर्व भाविकांना वार्षिक कौल दिला जाणार आहे. या दसरोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश प्रभुदेसाई यांनी केले आहे.