|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिक्षकद्वयी उमेश-किशोरी नाईक हे समाजाचा दुवा

शिक्षकद्वयी उमेश-किशोरी नाईक हे समाजाचा दुवा 

प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे प्रतिपादन, शिक्षणतज्ञ उमेश नाईक व किशोरीमाई यांचा सत्कार सोहळा

वार्ताहर/ पणजी

शिक्षकाने प्रामाणिकपणाने विद्यादान, संस्कारदान करायला हवे. शिक्षक समाजापासून वेगळा राहू शकत नाही. त्याला समाजकार्याचीही आवड असली पाहिजे. शिक्षण, समाजहित व राष्ट्रहीत जपणारे शिक्षक विद्यार्थीप्रिय व समाजप्रिय ठरतात. हे सर्व गुण उमेश नाईक आणि त्यांच्या पत्नी शिक्षिका किशोरीमाई नाईक यांच्याकडे असल्यामुळे  हे शिक्षकद्वयी विद्यार्थी, पालक व समाजातील एक महत्त्वाचा दुवा ठरले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पर्वरी येथे केले.

शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या आणि विविध माध्यमातून समाजकार्य करणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, निवृत्त मुख्याध्यापक उमेश अच्च्युत नाईक तसेच त्यांच्या पत्नी ज्येष्ठ शिक्षिका किशोरी यांच्या शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल अमृत महोत्सवी सत्कार सोहळा त्यांच्या आजी – माजी विद्यार्थी व मित्रमंडळीनी पर्वरी येथील आझाद भवन सभागृहात आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुभाष वेलिंगकर बोलत होते.

वेलिंगकर यांच्या हस्ते उमेश नाईक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विजयश्री काळबांधे यांनी किशोरीमाई नाईक यांची पारंपरिक ओटी भरली. नाईक दांपत्याच्या कन्या स्वाती काकोडकर, शिल्पा नाटेकर, श्वेता अंजनकर व तृप्ती काळबांधे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. पांडुरंग नाडकर्णी खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

शिक्षणक्षेत्रात दिले महत्वपूर्ण योगदान

प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले की, उमेश नाईक आणि किशोरीताई यांचा मनमिळावू स्वभाव, शांतपणा, चिकाटी यामुळेच विद्यार्थी शिकून नावारुपाला आले आहेत.  नाईक यांच्याकडे शिक्षणाबरोबरच समाजकार्याचा वारसा आहे. चिंबल परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून युनियन हायस्कूलच्या स्थापनेत पुढाकार घेऊन पुढे ही संस्था नावारुपाला आणली. गोवा शालांत मंडळाच्या माध्यमातूनही शैक्षणिक योगदान दिले. निवृत्तीनंतरही काही मुलांना ते मार्गदर्शन करत असून  त्यांच्याकडून एक पैसुद्धा घेत नाही.

सामाजिक क्षेत्रातही मोठे कार्य

गोमंतक मराठा समाज या संस्थेसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यांच्या कारकिर्दीत दयानंद स्मृती इमारतीला बळकटी आणण्यासाठी त्यांनी आर्थिक प्राप्तीचे गणित योग्य मांडले होते. एवढेच नव्हे तर संस्था व्यवस्थितपणे चालावी, यासाठी त्यांनी संस्थेची आदर्श घटना तयार केली. अन्य संस्थांमधूनही त्यांनी सामाजिक योगदान दिले, असे वेलिंगकर म्हणाले.

चिंबल येथील युनियन हायस्कूलचे शिक्षक आणि नाईक यांचे सहकारी अरुण नागवेकर, डॉ. विशाल सावंत, रामचंद्र नाटेकर, गोरख मांद्रेकर, ऍड. सुभाष सावंत, प्रकाश लोटलीकर यांनी दोन्ही गौरवमूर्ती संबंधी आपले विचार मांडले. नाईक यांचे विद्यार्थी तसेच दै. ‘तरुण भारत’चे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक यांनी नाईक दांपत्त्याला कवितेच्या माध्यमातून मनस्वी भावना व्यक्त केल्या आणि कवितेची स्मृती तसबीर त्यांना भेट दिली. माणिक पारोडकर यांनीही कविता सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश पार्सेकर व साथी यांचा भावगीतांचा कार्यक्रम झाला. तबल्यावर गोरख मांद्रेकर यांनी साथ दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल अंजनकर यांनी केले तर मिलिंद नाटेकर यांनी आभारप्रदर्शन पेले.

जीवनाच्या शेवटपर्यंत शिक्षकच राहणार : नाईक

सत्काराला उत्तर देताना उमेश नाईक म्हणाले की शिक्षकी पेशातून निवृत्त झाले म्हणजे कार्य समाप्ती होत नाही तर आपले कार्य आणखी समर्पित भावनेने करण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे. शासन आपल्याला निवृत्ती पेन्शन आजसुद्धा देत आहे. त्यामुळे आजची युवापिढी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना शिकवणे कोणत्याही मोबदल्याशिवाय चालू ठेवले आहे. आतापर्यंत आपण शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि जीवनाच्या शेवटपर्यंत शिक्षकच राहणार आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: