|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जीसीएला भरावा लागणार 14 कोटींचा आयकर

जीसीएला भरावा लागणार 14 कोटींचा आयकर 

खंडपीठाचा आदेश सहा महिन्यांची मुदत

प्रतिनिधी/ पणजी

बीसीसीआय या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गोवा क्रेकेट असोसिएशनला (जीसीए) दिलेल्या निधीवरही आयकर भरावा लागणार असून एकूण 14 कोटी 3 लाख 58 हजार 150 रुपयांचा आयकर भरण्यास खंडपीठाने 6 महिन्यांची मुदत दिली आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सचिव देश किनळेकर यांनी सदर याचिका सादर केली होती. याचिकादाराच्यावतीने ऍड. एन. एस. कंटक व ऍड. अभिजित कामत यांनी बाजू मांडली, तर आयकर आयुक्ताच्यावतीने ऍड. तानिया फरेरा व ऍड. अमिरा रझाक यांनी बाजू मांडली.

गोवा क्रिकेट असोसिएशनने 2006-07 ते 2012-13 या सहा वर्षाच्या कालावधीसाठी 14 कोटी 3 लाख 58 हजार 150 रुपयांचा आयकर भरला नसल्याचे आढळले होते. हा कर भरण्याची अंतिम मुदत 7 एप्रिल 2017 होती. 28 सप्टेंबर 2017 रोजी गोवा क्रिकेट असोसिएशनने आयकर आयुक्तांना पत्र लिहून भारतीय नियामक मंडळ बीबीसीआय सदर कर भरणार असून जो फंड सदर मंडळाने दिला होता त्यावर हा कर आकारण्यात आला होता, असे कळवून मुदत वाढवून मागण्यात आली होती.

आयकर खात्याने 22 नोव्हेंबर 2017 रोजी याचिकादार संघटनेला उत्तर पाठविले आणि मुदत वाढवून देण्याचा अधिकार कायद्याने आयकर खात्याला नसल्याचे स्पष्ट केले. बीबीसीआयकडे बोलणी चालू आहेत. त्यासाठी मुदतवाढीची आवश्यकता असल्याचे याचिकादाराच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने याचिकादाराला 180 दिवसांची मुदत वाढवून दिली.

 

Related posts: