|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तिसरे रेल्वेगेट फाटकावरील उड्डाणपुलाचे काम गतिमान

तिसरे रेल्वेगेट फाटकावरील उड्डाणपुलाचे काम गतिमान 

बेळगाव  / प्रतिनिधी

तिसऱया रेल्वेगेट फाटकावरील उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अधुनमधून पावसाचा अडथळा येत असूनही काम सुरू ठेवण्यात आले आहे. रेल्वे फाटकाच्या दुतर्फा पिलर उभारणीसाठी पायाखोदाई सुरू असून अत्याधुनिक यंत्रोपकरणांच्या साहाय्याने काम करण्यात येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱया रेल्वेमार्गावरील तीन उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे. आता चौथ्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून याकरिता 23 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीचा शुभारंभ सहा महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. पण काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास विलंब झाला होता. घटस्थापनेच्या मुहूर्तावर कामास प्रारंभ झाला आहे. सदर उड्डाणपूल पिलरवर उभारण्यात येणार आहे.  पिलर उभारणीसाठी पायाखोदाईचे काम आठ दिवसांपासून करण्यात येत आहे. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूने एकाचवेळी हे काम करण्यात येत आहे. याकरिता अत्याधुनिक यंत्रोपकरणांची मदत घेण्यात आली आहे.

ओव्हरब्रिजच्या कामाकरिता या मार्गावरील वाहतूक एकाच रस्त्याने वळविण्यात आली आहे. दुसऱया रेल्वेगेटने अनगोळकडे जाणाऱया मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. उद्यमबागमार्गे शहरात येणारी वाहतूक काँग्रेस रोडमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱया रेल्वेगेट परिसरासह या भागात वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वे फाटकावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.