|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » येळ्ळूर खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

येळ्ळूर खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर 

साक्षीदार उपस्थित नसल्यामुळे पक्षकारांना नाहक त्रास

प्रतिनिधी/ बेळगाव

येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी साक्षीदार हजर झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली आहे.

बुधवारी तीन गुह्यांतील संशयितांच्या खटल्याची सुनावणी होणार होती. या खटल्यासाठी तिन्ही वेगवेगळय़ा गुह्यांतील सर्वजण हजर होते. मागील वेळी काही जण हजर झाले नाहीत. त्यांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. ते  न्यायालयासमोर हजर झाले. याचबरोबर या तिन्ही खटल्यांतील सर्व जण आपापली कामे सोडून हजर होते. मात्र, त्या ठिकाणी साक्षीदार आणि फिर्यादीदार आले नाहीत. त्यामुळे या सर्वांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

गेल्या काही तारखांपासून साक्षीदार व फिर्यादीदार जाणूनबुजून न्यायालयात गैरहजर राहत आहेत. त्याचा त्रास येळ्ळूरच्या जनतेला होत आहे. सध्या शेतामध्ये  कामे सुरू आहेत. याचबरोबर तरुणवर्ग कामाला जात असतो. त्यांनाही कामावर सुटी घेऊन न्यायालयात हजर रहावे लागत आहे. सध्या न्यायालयाने साक्षीदार आणि फिर्यादीदार हजर झाले नाहीत, म्हणून मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश दिला असला तरी त्याची कार्यवाही होत नसल्यामुळे या खटल्याला गती मिळणे अवघड झाले आहे.

सोमवारी हे तिन्ही खटले पुढे ढकलण्यात आले असून येत्या 17 डिसेंबर, 20  डिसेंबर आणि 23 डिसेंबर रोजी या खटल्यांची सुनावणी होणार आहे. येळ्ळूरच्या वेशीतील फलक हटविल्यानंतर अनेक निष्पापांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. यामध्ये तरुणांबरोबर महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येळ्ळूरच्या तरुणांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. शाम पाटील कामकाज पाहत आहेत.