|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दिवाळी निमित्त बेळगाव-बेंगळूर सुविधा स्पेशल रेल्वे

दिवाळी निमित्त बेळगाव-बेंगळूर सुविधा स्पेशल रेल्वे 

बेळगाव / प्रतिनिधी

दिवाळीकरीता बेळगाव-बेंगळुर असा प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी दक्षिण-पश्चिम रेल्वेने जादा सुविधा स्पेशल टेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतपूर ते बेळगाव व बेळगाव ते यशवंतपूर या मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. यशवंतपूर येथून शुक्रवार दि. 25 तर बेळगाव येथून मंगळवार दि. 29 रोजी ही सुविधा स्पेशल रेल्वे धावणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

दिवाळी करीता बेळगावला येणाऱया प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. या काळात खासगी ट्रव्हल चालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. यासाठी रेल्वे विभागाने बेंगळूर – बेळगाव या दिवाळी स्पेशल सुविधा एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळी करीता येणाऱया व जाणाऱया प्रवाशांना याची सोय होणार आहे.

शुक्रवार दि. 25 रोजी रात्री 11 वा. यशवंतपूर स्थानकावरून ही रेल्वे सुटणार आहे. त्यानंतर तुमकूर, आरसीकेरे, बिरूर, दावणगेरी, हरिहर, हावेरी, हुबळी, धारवाड, अळणावर, लोंढा या स्टेशनवर थांबा घेत सकाळी 11.15 वा. बेळगाव स्थानकावर दाखल होणार आहे. मंगळवार दि. 29 रोजी सायंकाळी 7 वा. बेळगाव येथून ही रेल्वे निघणार आहे. तर दुसऱया दिवशी सकाळी 6.20 वा. यशवंतपूर येथे ही रेल्वे पोहोचणार आहे.

यामध्ये 1 एसी थ्री टायर कोच, 15 स्लिपर कोच तर लगेज बोगीचा समावेश यामध्ये असणार आहे. या स्पेशल दिवाळी एक्स्प्रेसमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. यापूर्वीही रेल्वे विभागाने दसऱयासाठी स्पेशल रेल्वे सेवा सुरू केली होती. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानेच दिवाळीसाठीही ही सुविधा स्पेशल सुरू करण्यात आली आहे.

मुंबई बेळगाव सुविधा स्पेशलची गरज

महाराष्ट्रात मोठय़ा उत्साहात दिवाळी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळी निमित्त सुट्टय़ा देण्यात आलेल्या असतात. या काळात आपल्या गावी येणाऱया नागरिकांसाठी मुंबई बेळगाव या मार्गावर सुविधा स्पेशल सुरू करावी, अशी मागणी मुंबई – पुणे येथे राहणाऱया बेळगावच्या रहिवाशांकडून रेल्वेकडे केली जात आहे. बेंगळूर बेळगाव सुविधा एक्सप्रेसच्या धर्तीवर मुंबई – बेळगाव सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.