|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दसऱयाचा मुहूर्त चोरटय़ांनी साधला

दसऱयाचा मुहूर्त चोरटय़ांनी साधला 

प्रतिनिधी/ निपाणी

शहर व उपनगरात चोऱयांचे प्रमाण अद्यापही कमी न होता वाढतच चालले आहे. सीसीटीव्ही कार्यरत असतानाही कॅमेऱयांनाही चकवा देत चोरटे डाव साधत आहेत. मंगळवारी तर भरदिवसा दसऱयादिवशीच दोघा भामटय़ांनी वयोवृद्ध दाम्पत्यास बोलण्यात गुंतवून ठेवत, महिलेच्या गळय़ातील तब्बल साडेआठ तोळे दागिने लंपास केले. ही घटना येथील चिकोडी रोडवर मंगळवारी सकाळी 9.30 वाजता घडली.

निपाणी येथील आंबा मार्केट शेजारी शमूवेल सकट व रिबेका सकट हे सेवानिवृत्त दाम्पत्य वास्तव्यास आहे. मंगळवारी रिबेका यांची तब्बेत ठिक नसल्याने उपचारासाठी सकट दाम्पत्य हे दुचाकीने जात होते. याचवेळी सकाळी 9.30 च्या सुमारास चिकोडी रोडवरील ब्रह्मनाथ बँकेनजीक आले असता पाठीमागून हेल्मेट घातलेली व्यक्ती दुचाकीवरून आली. यावेळी सदर व्यक्तीने सकट दाम्पत्याच्या दुचाकीसमोर आडवी दुचाकी लावत त्यांना थांबविले.

यावेळी त्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असून हेल्मेट कुठे आहे, अशी विचारणा केली. तसेच शहरात इतक्या चोऱया होत असताना एवढे दागिने घालून फिरण्याची गरज काय?, असे दरडावत सोने तत्काळ रुमालमध्ये काढून ठेवण्यास सांगितले. यावेळी शमूवेल सकट हे खिशातील रुमाल काढत असताना सदर व्यक्तीने दागिने आपल्या हातात घेतले व रुमालमध्ये केवळ मोबाईल व घडय़ाळ ठेवून रुमाल स्वतःहून सकट यांच्या दुचाकीच्या डिग्गीत ठेवला व तेथून परत मागे येत सदर व्यक्ती बसस्थानकाच्या दिशेने रवाना झाली.

साडेतीन लाखाचा ऐवज लंपास

यावेळी सकट दाम्पत्याने डिग्गीतील रुमाल काढून पाहिला असता रुमालमध्ये दागिने नसल्याचे आढळून आले. यातून आपली फसवणूक झाल्याचे समजताच सकट यांनी एकच आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत सदर भामटा पसार झाला होता. या फसवणुकीतून सकट दाम्पत्याचे दोन तोळे ब्रेसलेट, दोन तोळे चेन, दीड तोळय़ाचे मंगळसूत्र, दीड तोळय़ाची सोन्याची माळ, दीड तोळय़ाच्या अंगठय़ा असे एकूण साडेआठ तोळय़ाचे दागिने लांबविण्यात आले. यामुळे सुमारे साडेतीन लाख रुपयांचा फटका सकट दाम्पत्यास बसला.

रात्री उशिरापर्यंत घटनेचा आढावा

बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात सकट यांनी घटनेची फिर्याद दिली. सीपीआय संतोष सत्यनायक, पोलीस उपनिरीक्षक ए. पी. होसमनी सहकाऱयांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मंगळवारी रात्री उशिरा चिकोडीचे एएसपी मिथुनकुमार यांनीही घटनेचा आढावा घेतला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.  

सीसीटीव्हीमध्ये भामटे कैद

दरम्यान घटनेची नोंद होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानुसार सदर भामटा दुचाकीसह छ. संभाजी चौकातून बेळगाव नाक्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

कारवाईचे नाटक अन् भामटे पसार

सकट दाम्पत्याला लुटणारी ती व्यक्ती अकोळ रोड क्रॉसपासूनच त्यांच्या पाळतीवर होती. चिकोडी रोडवर दाम्पत्याला अडवून विचारत असतानाच,  पाठीमागून आलेल्या एका पादचाऱयास अडवून त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यामुळे ती व्यक्ती खरोखरच पोलीस असल्याचे सकट दाम्पत्यास वाटले. मात्र काहीवेळानंतर तो पादचारीही दुचाकीस्वार भामटय़ासोबत असल्याचे स्पष्ट झाले.