|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेला धक्का : 26 नगरसेवकांसह 300 कार्यकर्त्यांचे राजीनामे

शिवसेनेला धक्का : 26 नगरसेवकांसह 300 कार्यकर्त्यांचे राजीनामे 

ऑनलाइन टीम / ठाणे : 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. भाजपसोबतच्या युतीमुळे सेनेला अनेक जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केलेल्या अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीमुळे तिकीट कापल्या गेलेल्या शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली होती. मात्र, यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. कारण, राज्यातील शिवसेनेच्या 26 नगरसेवक आणि 300 कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. जागावाटपावरून हे नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

जागावाटप आणि उमेदवार निवडी विषयीची नाराजी जाहीर करण्यासाठी हे राजीनामे पाठवण्यात आल्याचे समजते. नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजपसमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत. कारण महायुतीत काही ठिकाणी शिवसेनेचाही दबदबा आहे. मात्र, यावेळी काही ठिकाणी भाजपने त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अशावेळी उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधला सामोरे जावे लागणार आहे.