|Monday, February 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संस्कृत साहित्यातील अनमोल रत्नेः(4) मुद्राराक्षसम्।

संस्कृत साहित्यातील अनमोल रत्नेः(4) मुद्राराक्षसम्। 

विशाखादत्तविरचित ‘मुद्राराक्षसम्’ हे नाटक ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारलेले, राजनैतिक स्वरूपाचे, संस्कृत नाटय़सृष्टीतील रूळलेले विषय सोडून वेगळय़ा वाटेने जाणारे नाटक आहे. चाणक्मयाने आपल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात राजनीतीची तत्त्वे मांडली आहेत. त्यांचा आधार घेऊनच विशाखादत्ताने ‘मुद्राराक्षसम्’ नाटकाची उभारणी केली आहे. ह्या नाटकात नायिका नाही, हे याचे आणखी एक वैशिष्टय़! आर्य चाणक्मयाने नंदवंशाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याला मगधाच्या गादीवर बसवले. त्याचे राज्य सुरळीत चालावे म्हणून नंदराजाचा प्रामाणिक व नि÷ावान अमात्य, ‘राक्षस’ याला चंद्रगुप्ताच्या दरबारी अमात्यपद स्वीकारण्यास कसे भाग पाडले यासंबंधीचे कथानक या नाटकात आले आहे. राक्षसाला आपल्या तावडीत घेण्यासाठी चाणक्मय सर्व प्रकारचे डावपेच लढवतो, कट-कारस्थाने करतो. त्यांचे बीजारोपण पहिल्या अंकात होते व सातव्या अंकात राक्षस प्रत्यक्ष चंद्रगुप्ताचे अमात्यपद स्वीकारतो. चाणक्मयाचा राजकीय हेतू सफल होतो. राक्षसाच्या अनुभव आणि ज्ञानाचा फायदा चंद्रगुप्ताला राज्यकारभार करताना होणार असतो.

 नाटकाच्या एक ते सात अंकांमधून विविध प्रसंगांची गुंफण केली आहे. त्यामुळे नाटकाला चांगलीच गती प्राप्त होते. चाणक्मयाच्या राजकीय खेळींनी तसेच पात्रांच्या संवादातून सर्व अंक अतिशय रंजक झाले आहेत. आर्य चाणक्मयाच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि राजकारणाची योग्य ती जाणीव हे प्रसंग करून देतात. अमात्य राक्षसाची मुद्रांकित अंगठी आर्यचाणक्मयाला मिळाल्यामुळे राक्षसाला पकडणे सोपे झाले. अंगठीवरील मुदेमुळे चाणक्मयाला आपल्या कटामध्ये मुदेचा वापर करीत आपले बेत सफल करता आले, म्हणूनच ह्या नाटकाचे नाव ‘मुद्राराक्षस’ असे आहे. मुद्रया अधिगता राक्षसः यस्मिन् नाटके, तद् मुद्राराक्षसम्। असे ह्याचे स्पष्टीकरण देता येईल.  ह्या नाटकात पात्रांच्या जोडय़ा आहेत. चाणक्मय व राक्षस, चंद्रगुप्त व मलयकेतू इ.. ती एकमेकांचे चरित्र खुलवित जातात. चाणक्मय राजनीतीचे आचार्य, दूरदर्शी मंत्री, नाना प्रकारच्या गुप्तचरांकडून आपले कार्य सिद्धीस नेणारा कुशल प्रशासक आहे. पण तो मनाने कोमलही आहे. राक्षस कूटनीतीत जरी असफल होतो, तरी माणुसकीने परिपूर्ण आहे. मित्राच्या प्राणरक्षणासाठी तो स्वतः बंधनात अडकतो व आपल्या मित्राचा उद्धार करतो. चंद्रगुप्त हा मोठा गुरुभक्त, प्रजाहितदक्ष व महापराक्रमी राजा आहे. त्याच्यासमोर उपकारकर्त्यालाही विसरणारा मलयकेतू हा अनुभवहीन युवक विशाखादत्ताने उभा केला आहे. हे नाटक गुप्तकाळात लिहिले गेले आहे. विशाखादत्ताने ‘देवीचंद्रगुप्त’ नावाचे दुसरे नाटकही लिहिले. त्यात चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्याची कथा गुंफली आहे. गुप्तकाळात शास्त्रीय संगीतही उन्नतीशील होते. समुद्रगुप्त हा वीणावादनात प्रवीण होता. त्याच्या मुदेवरही तसे चित्र पहायला मिळते. भारतीय संगीत आणि नृत्य यांच्या चरमोन्नतीचे दर्शन संस्कृत नाटकांमधून पहायला मिळते. भास, कालीदास, शूद्रक, विशाखादत्त, भवभूती इत्यादींच्या नाटकांमधूनही ते पहायला मिळते. ‘मुद्राराक्षस’ हे कूट राजनीतीवर आधारित एक उत्कृष्ट नाटक आहे यात शंका नाही!

 

Related posts: