|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » लिंबू ठेवणे ही अंधश्रद्धा नव्हे; श्रद्धाच!

लिंबू ठेवणे ही अंधश्रद्धा नव्हे; श्रद्धाच! 

भारतीय परंपरा पाळण्यात गैर काय? : निर्मला सीतारामन यांचा सवाल

पुणे / प्रतिनिधी

लिंबू ठेवणे, हा भारतीय संस्कृती, परंपरा व श्रद्धेचाच एक भाग आहे. त्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, अशा शब्दांत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल विमानांच्या चाकांखाली लिंबू ठेवण्याच्या मुद्दय़ावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे शुक्रवारी जोरदार समर्थन केले. 

भारतीय हवाईदलाकडून विजयादशमीच्या मुहूर्तावर राफेल विमानाचे पूजन करताना चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरून जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत असताना सीतारामन त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱयावर आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या विषयावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, राफेल विमाने ताब्यात घेताना ओम लिहिणे वा लिंबू ठेवणे, यामध्ये काहीही गैर नाही. भारतीय संस्कृती व परंपरेला अनुसरूनच हे आहे. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार काम करीत असतो. हा देखील श्रद्धेचाच भाग आहे. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा वा अंधविश्वास नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही. मात्र, या युगाबरोबरच आपल्या संस्कृतीचाही आदर केला पाहिजे. सरस्वतीपूजन, शस्त्रपूजन आपण पूर्वापार करीत आलो आहोत. त्यात काही वावगे असण्याचे कारणच नाही. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी व त्यांच्या पत्नीनेही संरक्षण सामग्री ताब्यात घेताना त्यांच्या पद्धतीने व परंपरेप्रमाणे पूजन केले होते. मात्र, त्या वेळी या विषयावर कुणीही चर्चा केली आहे. आता केवळ लिंबू ठेवले गेले, तर ती लगेच अंधश्रद्धा कशी, असा सवाल त्यांनी केला.

370 हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर सबंध देशासाठी हा महत्त्वाचा असा विषय आहे. त्याबद्दल प्रत्येकाला अभिमानच असला पाहिजे. हा निर्णय झाल्यानंतरही जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुरळीत आहे. मात्र, हा मुद्दा जाहीरनाम्यात कुणी घेतला, हे मला माहीत नाही. तथापि, आर्थिक विषय व बेरोजगारीच्या मुद्दय़ावरही सरकार गंभीर असून, त्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. देशातील ऑटोमोबाईलमधील उद्योजकांशी आपली चर्चा झाली आहे. अनेक सेक्टर्सना मदत केली आहे. अजूनही पर्याय बंद केलेले नाहीत. काय ते पाहू. चर्चेनंतर याबाबत भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मागच्या वर्षांत प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे, असे कौतुकोद्गार काढत बँक घोटाळे रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

सांगली, कोल्हापुरातील मदतनिधीचे राजकारण नको

सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्त जनतेला अद्याप निधी न मिळाल्याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, केंद्र सरकारच्या पथकाकडून याची पाहणी झाली आहे. तातडीचा वा अंतरिम मदतनिधी देण्यात आला आहे. याबाबत कमिटीही नेमण्यात आली असून, त्यानुसार उर्वरित निधीही दिला जाईल. मात्र, याचे राजकारण नको, असे मत व्यक्त करीत जीएसटीचे उत्पन्न कमी झालेले नाही. मात्र, पूरग्रस्तभागातील करधारकांना सवलत देण्यात आली होती. त्याचा थोडा फार परिणाम त्यावर झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

Related posts: