|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नवमहाराष्ट्र निर्मितीसाठी भाजपाला साथ द्या : डॉ. सावंत

नवमहाराष्ट्र निर्मितीसाठी भाजपाला साथ द्या : डॉ. सावंत 

आ. गाडगीळ यांच्या विकासकामांचा आलेख मोठा : सर्वसामान्यांच्या विकासाचे ध्येय

प्रतिनिधी/ सांगली

 गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जो बदल झाला आहे, त्याचे सर्व श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते. विरोधकांना मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करण्यासाठी एकही मुद्दा नाही इतका स्वच्छ कारभार त्यांनी केला आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जनतेने भाजपाच्या पाठीशी राहावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

रोटरी क्ल्ब येथे महाजनादेश महाचर्चा अंतर्गत महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारानिमित्त व्यावसायिकांशी संवाद साधण्यासाठी आले होते.  त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी महापौर सौ. संगीता खोत, सौ. नीता केळकर, डॉ. भारती शिंदे, दीपक शिंदे, सतीश मालू, डॉ. रणजित जाधव उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, गेल्या 70 वर्षात काँग्रेसने सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी एकही योजना आणली नाही. पण, 2014 पासून भाजपाने सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. पंतप्रधान जनधन योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजनेपर्यंत. सुकन्या योजनेपासून ते महात्मा फुले जनाधार योजनेपर्यंत 80 योजना भाजपाने आणल्या आहेत. या योजनेचे उद्दिष्टच सर्वसामान्यांचा विकास हे आहे. भाजपाने आता मुलभूत गोष्टीबरोबरच मानवी विकास योजनेवर काम सुरू केले आहे. या विकासातंर्गत रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण याविषयी मोठे काम सुरू आहे.

आर्थिक मागासांना आरक्षण

या देशातील सर्व धर्मातील आणि जातीतील विद्यार्थ्यांना 10 टक्के आर्थिक मागास आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या हुशार विद्यार्थ्याना आता चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याशिवाय डॉक्टर आणि इंजिनिअरींगच्या जागा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रात येणाऱया विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

मराठा समाजालाही आरक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम हे भाजपा सरकारने केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात अनेक कायदेशीर अडीअडचणी येत होत्या. पण, या कायदेशीर अडीअडचणीवर मात करण्याचे काम भाजपा सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे.  जम्मू काश्मिरच्या विकासात अडथळा आणणारे 370 कलम भाजपने रद्द करून 70 वर्षानंतर या देशात एक संविधान एक निशान प्रत्यक्षात आणले आहे.

आ. गाडगीळ यांना मोठय़ा मताधिक्क्यांनी विजयी करा

आमदार गाडगीळ हे स्वच्छ चारित्र्याचे आणि विकास कामात अग्रेसर असणारे आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी एक हजार कोटी रूपये मतदारसंघात आणले आहेत. त्यांच्या विकासकामांचा आलेख मोठा आहे. अशा आमदारांच्या पाठीशी जनतेने राहून त्यांना मोठे मताधिक्य देण्याची गरज आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक सतीश मालू, डॉ. भारती शिंदे, दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत संजय परमणे यांनी केले. यावेळी बहुसंख्येने उद्योजक, इंजिनिअर्स, डॉक्टर, व्यापारी उपस्थित होते.

 

Related posts: