|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मोडी लिपीतून विद्यार्थिनींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा..!

मोडी लिपीतून विद्यार्थिनींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा..! 

प्रतिनिधी/ मिरज

दिवाळी म्हटलं की शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा पत्रे हे समीकरण ठरलेलंच. आजवर हे शुभेच्छा संदेश आपण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देत आलो. सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील मुलींनी मात्र, यंदा दिवाळीचे हे शुभेच्छा संदेश मोडी लिपीतून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. अस्तंगत होत चाललेल्या मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मोडी लिपीत संदेश लिहिलेल्या आकर्षक भेटकार्डांची स्पर्धा आयोजित करण्यात आली.   

  सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात गेली सहा-सात वर्षे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, इतिहास विभागप्रमुख प्रा. सौ. यु. एन. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर हे मोडी लिपी प्रशिक्षण देत आहेत. मोडी लिपीविषयी जिज्ञासा आणि जागृती निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयात केले जात आहे.

मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महाविद्यालयामार्फत दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मोडी लिपी दिन, मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन असे कार्यक्रम होतात. गेली तीन वर्षे मोडी लिपीतील भेट शुभेच्छा कार्डांचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाही विद्यार्थिनींनीही या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. नानाविध प्रकारचे साहित्य वापरून आकर्षक सजावट केलेली आणि त्याचबरोबर मोडी शुभेच्छा संदेश असणारी भेटकार्डे तयार करण्यात आली. त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आएएस अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी महेश चोथे, सुधाकर तेलंग, डॉ. विकास सलगर, डॉ. रमेश होसकोटी, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. उर्मिला क्षीरसागर, मानसिंगराव कुमठेकर उपस्थित हेते.

मोडी लिपीतून दिवाळीची भेटकार्डे तयार करण्यामागे नष्ट होत चाललेल्या या ऐतिहासिक लिपीला संजिवनी देण्याचे काम होत आहे. शुभेच्छा संदेशातून मोडी लिपीचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवण्यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.