|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चित्रपट निवडीसाठी ज्युरीवर दबाव आणू शकत नाही

चित्रपट निवडीसाठी ज्युरीवर दबाव आणू शकत नाही 

उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ पणजी

 20 ते 28 दरम्यान होणाऱया सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू असून यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा धूमधडाक्यात होणार आहे. महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात गोमंतकीय चित्रपटांना स्थान देण्यात आले नसल्यामुळे सध्या गदारोळ झाला आहे. इंडियन पॅनोरमा विभागात गोमंतकीय चित्रपटाची निवडीवर गोवा मनोरंजन सोसायटी आणि डीएफएफ यांची कोणतीही भूमिका नसून चित्रपट निवडीसाठी ज्युरीवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही असे स्पष्टीकरण देऊन विरोधी पक्ष यात राजकारण करत असल्याचा आरोप गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

यापूर्वीही अनेकदा गोमंतकीय चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात निवडले गेलेले नाहीत. परंतु गोमंतकीय चित्रपटांना इंडियन पॅनोरमा विभागात संधी द्यावी व या विभागात चित्रपटांना समाविष्ट करावे अशी विनंती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात आली असल्याचे फळदेसाई यांनी पुढे सांगितले.

यंदाचा आंचिम सुवर्णमहोत्सवी असल्यामुळे त्यासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. याशिवाय 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व साधनसुविधा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नुकतीच केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आंचिमच्या तयारीची आढावा बैठक दिल्लीत झाले. सर्व कार्यक्रम पूर्वनियोजित ठरल्यानुसार आखले जातील. या बैठकीला गोवा मनोरंजन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा व सरव्यवस्थापक मृणाल निकेतन वाळके यांची उपस्थिती होती अशी माहिती फळदेसाई यांनी यावेळी दिली.

दरवर्षी गोवा आंचिममध्ये सुविधांवर खर्च केला जातो. यंदा सुमारे 18 कोटी रूपये साधनसुविधांवर खर्च करण्यात आला आहे. याचबरोबर राज्याला जास्त खर्चाचा बोझा होऊ नये यासाठी प्रायोजकही पाहण्यात येत आहेत. त्यामुळे खर्चाचा बोझा कमी होऊ शकतो. 2016 साली आंचिमसाठी राज्याकडून 22.62 कोटी रूपये खर्च केले होते. 2017 साली 17.08 कोटी रूपये, 2018 साली 12.94 कोटी रूपये जो सगळय़ात कमी खर्च करण्यात आला होता.

महोत्सवादरम्यान जॉगर्स पार्क आल्तिनो पणजी आणि मिरामार येथे चित्रपटांचे ओपन एअर स्क्रीनिग करण्यात येणार आहे. पॅनोरमा विभागाच्या विशेष विभागात ‘आमोरी’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. याशिवाय विविध प्रकारच्या स्पर्धांचेही आयोजन महोत्सवात करण्यात आले आहे. याचबरोबर मुलांसाठी ‘चिल्ड्रन व्हिलेज’ म्हणून एक विशेष विभाग असणार आहे. आर्ट पार्क, संगीत कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय कला महाविद्यालयातर्फे विशेष सादरीकरणाचे आयोजन असेल. महोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे स्टेट पवेलियन ठरणार आहे. या विभागात प्रत्येक राज्य पर्यटन संस्कृती सादर करतील अशी माहिती फळदेसाई यांनी दिली. 

2011 ते 2015 या दरम्यान गोवा मनोरंजन सोसायटीच्या चित्रपट आर्थिक साहाय्य योजनेचा एकूण 9 चित्रपटांनी लाभ घेतला आहे. काही तांत्रिक किंवा कागदापत्रांमुळे 8 चित्रपटांना आर्थिक साहाय्य देण्याची मंजूरी थांबविण्यात आली आहे. तसेच तीन चित्रपट नाकारण्यात आले आहेत अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.