|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अतिरीक्त वजनामुळे अनेक आजारांना आमंत्रण 

अतिरीक्त वजनामुळे अनेक आजारांना आमंत्रण  

पुणे / प्रतिनिधी :
आहार, व्यायाम आण विश्रांती ही आरोग्याची त्रिसुत्री असून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शनाखाली या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास वाढीव वजनावर नियंत्रण मिळवता येते. अतिरीक्त वजन हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा पैलू नसून तो अवगुण आहे. कारण अतिरीक्त वजनामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते, असेे मत इंडियन मेडिकल असोसिएशन, अर्थात आयएमए महाराष्ट्रचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले. 
डॉ. प्रणिता अशोक आणि डॉ. शिशिर जोशी लिखित ”समतोल आहाराचा आणि वजनाचा निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भोंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी भोंडवे बोलत होते.
डॉ अविनाश भोंडवे म्हणाले की, जीवनशैलीत मनावरचा ताबा आणि आहारावरचे नियंत्रण आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे शरीराची हालचाल कमी होत आहे. विज्ञानाच्या नवनवीन अविष्कारांमुळे माणसाची वाटचाल अचलतेकडे होत असून त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे साहजिकच वजन वाढून स्थूलतकडे प्रवास सुरू झाला आहे. वजन कमी असल्यास अनेक आजार आपण टाळू शकतो, असा आमचा अनुभव आहे. वैद्यकीय क्षेत्रात लागत असलेल्या नवीन शोधांमुळे आयुर्मान वाढत चालले आहे. ते आयुर्मान वाढून गुणवत्तापूर्ण ज्येष्ठत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर वजन कमी करण्याच्या नियमांचा पाठपुरावा करावा लागेल. वेट लॉस या संकल्पनेविषयी जुजबी ज्ञान असलेल्या काही व्यक्तींनी केवळ विपणन आणि जाहिरातीव्दारे या क्षेत्राला व्यावसाायिक स्वरुप दिले आहे. त्यामुळे वेट लॉस हे एक धंदेवाईक क्षेत्र झाले असून त्यामध्ये अशास्त्रीय पद्धतीने पट्ट्यावर चालवणे, लहरींचा वापर करणे, अशास्त्रीय लेझर किरणांचा वापर करणे, तयार खाद्य पदार्थ आणि पेयांचा मारा करणे, अनेक तास उपाशी रहायला सांगणे या अशास्त्रीय, अवैद्यकीय आणि भ्रामक उपाययोजनांमुळे अनेकदा जीवाशी खेळ केला जातो. वजन कमी करण्याच्या बाबतीत वैद्यकीय ज्ञान असलेल्या अनुभवी व्यक्तीकडूनच मार्गदर्शन घ्यावे. हे ज्ञान विज्ञानाच्या कसोटीवर घासलेले असावे. 
डॉ. संजय पाटील म्हणाले की, वजन कमी करण्यासाठी चालणे हा एक मुलभूत आणि सहज करता येण्यासारखा व्यायाम आहे. चालण्याच्या व्यायामुळे सर्वोत्तम कॅलरी बर्न होऊन आपल्या शरीरात निर्माण होणा-या विशिष्ट ग्रंथींमुळे आपल्याला उत्साही वाटते आणि आपले वजनही कमी होते. पळणे, पोहणे, सायकल चालवणे, बॅटमिंटन या व्यायाम प्रकारात वेळोवेळी बदल केल्यास त्या प्रत्येकातील गुणवैशिष्ट्यांचा लाभ आपल्याला मिळतो. 

Related posts: