|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विधानसभेच्या आखाडय़ात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार

विधानसभेच्या आखाडय़ात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार 

कृष्णात चौगले : कोल्हापूर

उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराचा खरा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांसह जिह्यातील नेत्यांनी जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा आदी माध्यमातून जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोशल मिडियावरूनही प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. हा प्रचार अधिक गतीमान आणि प्रभावी करण्याची जबाबदारी काँग्रेस आघाडी, युतीसह बहुजन वंचित आघाडीने स्टार प्रचारकांवर सोपवली आहे. ज्यांची वक्तृत्वावर आणि भाषाशैलीवर कमांड आहे, भाषणातून विरोधकांना नामोहरम करण्याची कला अवगत आहे, अशा अनेक नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. त्यामुळे येत्या आठवडय़ाभरात प्रचारतोफा धडाडणार आहेत.

कोल्हापूर जिह्यातील बहुतांशी मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होत आहे. काँग्रेस आघाडी विरोधात युतीचे उमेदवार रिंगणात आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षासह काही अपक्ष उमेदवार देखील नशीब आजमावत आहेत. पण आघाडी व युतीच्या उमेदवारांमध्येच प्रामुख्याने चुरशीची लढत होणार आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवारही निवडणूक रिंगणात ताकदीने उतरणार आहेत. परिणामी मतांची विभागणी होणार असल्यामुळे सर्वच उमेदवारांची घालमेल सुरु आहे. त्यामुळे ‘आता नाही तर कधीच नाही’ या आवेशाने प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वच पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांच्या सभांमध्ये विरोधकांवर आणि त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणावर जोरदार टिका-टिप्पणी केली जात आहे. तर दुसऱया बाजूस डाव्या आघाडीच्या आणि अपक्ष उमेदवारांकडून आपआपल्या ताकदीनुसार प्रचार करत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर आपला निशाणा साधला जात आहे. औट घटकेचा मतदारराजा मात्र गेले आठ दिवस या सर्वांची भाषणे, मनोगते निमुटपणे ऐकत आला असला तरी मतदान कोणाला करायचे याची खुणगाठ मात्र त्याने यापूर्वीच पक्की बांधली आहे. तसेच तो कोणाला मतदान करणार याचा थांगपत्ताही सध्या लागत नाही. त्यामुळे उमेदवारांकडून मतदान पक्के करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. तसेच कार्यकर्त्याकडून पै-पाहुणे आणि मित्रमंडळीकडे जाऊन आपल्या नेत्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

कागल, चंदगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. तर पाच जागा काँगेसला दिल्या असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक आणि शेकापला एक दिली आहे. त्यामुळे या आघाडीचे राष्ट्रीय नेते म्हणून इच्छूकांच्या नजरा शरद पवार यांच्या सभांकडे लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडून राज्यातील प्रचारासाठी सुमारे पन्नास स्टार प्रचारक नियुक्त केले आहेत. काँग्रेसनेही तितकेच स्टार प्रचारक निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे यापैकी आपल्या मतदारसंघात प्रभावी स्टार प्रचारक यावा यासाठी उमेदवारांकडून वरिष्ठ नेत्यांना साकडे घातले आहे. राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी 14 ऑक्टोबर रोजी अमोल कोल्हे यांच्या कागल, चंदगड आणि राधानगरी मतदारसंघात जाहीर सभा आहेत. तर 17 ऑक्टोबरला अमोल मिटकरी यांच्या सभा होणार आहेत.

शरद पवार यांच्या प्रचार सभांसाठी आघाडीच्या नेत्यांचे साकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारसभा घ्यावी यासाठी काँग्रेस आघाडीच्या अनेक नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यांची सभा झाल्यास आपल्याला मोठा फायदा होईल असा त्यांचा अंदाज आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पी.एन.पाटील यांनी शरद पवार यांची सभा व्हावी यासाठी साकडे घातले आहे.

स्वाभिमानीचे स्टार प्रचारक पवार आणि शेट्टी

काँग्रेस आघाडीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिरोळची जागा दिली आहे. त्यामुळे तेथील नाराज झालेले राष्ट्रवादीचे इच्छूक उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बंडखोरी केली आहे. परिणामी तेथील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संदिग्ध झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची साथ मिळावी यासाठी स्वाभिमानीने शिरोळ मतदारसंघात शरद पवार यांच्या सभेची मागणी केली आहे. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदारसंघ पिंजून काढत उमेदवार अनिल उर्फ सावकार मादनाईक यांच्या प्रचाराची धुरा खंबीरपणे सांभाळली आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांची मदार विनय कोरेंवर

जनसुराज्य शक्ती पक्षाकडून जिह्यात चार ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत. पन्हाळा शाहूवाडीमध्ये जनसुराज्यचे सर्वेसर्वा माजी मंत्री विनय कोरे हे स्वतः मैदानात उतरले आहेत. तर हातकणंगले, शिरोळ, चंदगड या मतदारसंघातून ताकदीचे उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून विनय कोरे यांनाच भूमिका पार पाडावी लागणार आहे.

काँग्रेसकडे 40 स्टार प्रचारक, कोल्हापूरमध्ये कोण येणार याकडे लक्ष

राज्यातील कॉग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह 40 जणांची निवड केली आहे. पण यौकी कोल्हापूर जिह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कोण येणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

युती उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरात

भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी रविवारी (13 ऑक्टोबर) कोल्हापूरात जाहीर सभा होणार आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे. तसेच जाहीर प्रचाराची सांगता होईपर्यंत भाजपमधील अनेक स्टार प्रचारक कोल्हापूरात येणार आहेत.

Related posts: