|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी हवालदिल

पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी हवालदिल 

प्रतिनिधी / कणकवली:

यावर्षी पावसाळय़ाच्या कालावधीत मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. यात अनेक शेतकऱयांचे नुकसान झाले. आता अनेक ठिकाणी भातशेती कापणीला आलेली असून दररोजच पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी पुरते अडचणीत सापडले आहे. पाऊस न थांबल्यास हातातोंडाशी आलेली शेती वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदाच्या पावसाळय़ात अपेक्षेपेक्षा जादा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागातील भातशेतीत पाणी भरल्याने शेतकऱयांचे नुकसान झाले होते. त्यातच सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी भातशेतीच्या फुलोऱयाचेही नुकसान झाले. आता अनेक ठिकाणी भातशेती कापणीला आलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज गडगडाटासह पाऊस कोसळत आहे.

सातत्याने कोसळत असलेल्या या पावसामुळे तायर झालेली भातशेती कापायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज दुपारनंतर येणाऱया पावसामुळे भात कापणी करणे कठीण बनले आहे. यामुळे हळवी भातपिके कापणीसाठीची वेळही टळून जात आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडत आहेत.