|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » दक्षिण अफ्रिकेची 275 धावांपर्यंत मजल

दक्षिण अफ्रिकेची 275 धावांपर्यंत मजल 

तळातील फलंदाजांचा चिवट प्रतिकार, टीम इंडियाकडे 326 धावांची आघाडी

सुकृत मोकाशी /  पुणे

 दक्षिण अफ्रिकेच्या तळातील फलंदाजांनी केलेल्या चिवट प्रतिकारानंतर भारताविरूद्धच्या दुसऱया कसोटीत अफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर संपुष्टात आला. कसोटीच्या तिसऱया दिवशी भारताला अफ्रिकेचा पहिला डाव गुंडाळायला शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागली. वर्नल फिलेंडर आणि केशव महाराज यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताची दमछाक झाली. भारताकडे आता 326 धावांची आघाडी असून, भारत फॉलोऑन देणार की दुसऱया डावात फलंदाजी करणार, हे उद्याच कळेल.

 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानात हा सामना सुरू आहे. त्याआधी अफ्रिकेने 3 बाद 36 अशा केविलवाण्या स्थितीतून तिसऱया दिवशी खेळायला सुरुवात केली. अफ्रिकेची उपहारापर्यंत 6 बाद 136 अशी अवस्था झाली होती. सकाळच्या सत्रात उमेश यादव आणि महंमद शमी यांनी टिच्चून गोलंदाजी केली. दिवसाच्या तिसऱयाच षटकांत शमीने अँरीच नॉरखिया याला चौथ्या स्लिपमध्ये विराट कोहलीकरवी झेलबाद करून टीम इंडियाला झकास सुरुवात करून दिली. त्यानंतर उमेश यादवने थेऊनिस डी ब्रुयनला यष्टीमागे सहाकरवी झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेचे 21 षटकांत 5 बाद 53 अशी दुर्दशा केली. सहाने उजवीकडे झेपावत त्याचा सुंदर झेल घेतला. यानंतर सहाव्या विकेटसाठी डुप्लसिस आणि डिकॉक यांनी 75 धावांची भागीदारी करत आफ्रिकेला शतकी टप्पा पार करून दिला. उपहाराला 15 मिनिट बाकी असताना अश्विनने डिकॉकच्या बेल्स उडवून ही जोडी फोडण्यात यश मिळवले. यानंतर डुप्लसिस आणि मुथुस्वामी यांनी अधिक पडझड न होता अफ्रिकेला उपहारापर्यंत 136 धावापर्यंत पोहोचवले.

 उपहारानंतर अर्ध्या तासातच अफ्रिकेला अजून दोन धक्के बसले. जडेजाने मुथ्थुस्वामीला पायचीत करून आपल्या जाळय़ात ओढले. यानंतर डुप्लिसिस बाद झाला. त्याला अश्विनने स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. तो बाद झाल्यावर भारत लगेच अफ्रिकेचा पहिला डाव संपवेल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली.

 महाराज आणि फिलेंडरची शतकी भागीदारी

V

 दक्षिण आफ्रिका 8 बाद 162 अशा संकटात असताना केशव महाराज धावून आला. त्याने व फिलेंडरने मिळून 109 धावांची भागीदारी केली. महाराज दुखापतग्रस्त असूनही संघाची गरज ओळखून मैदानात उतरला. महाराज आणि फिलेंडरने भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहिली. वर्नल फिलेंडर आणि केशव महाराज यांनी खेळपट्टीवर नांगर टाकला. त्यामुळे भारतीयांच्या अपेक्षांना सुरुंग लागला. चहापानापर्यंत अफ्रिकेची 8 बाद 197 अशी धावसंख्या होती.

 चहापानानंतरही महाराज आणि फिलेंडर यांनी भारताची गोलंदाजी सहजपणे खेळून काढली. शमी, यादव, इशांत शर्मा, अश्विन, जडेजा यांना त्यांनी दाद दिली नाही. शेवटी अश्विनने महाराजला बाद करून ही जोडी फोडली. महाराज 72 धावा काढून बाद झाला. त्यानंतर रबाडाही लगेच बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावावर संपुष्टात आला. रबाडाला अश्विनने पायचीत केले. रबाडाने या वेळी रिव्हय़ू घेतला. पण, त्याचा काही फायदा झाला नाही. फिलेंडरने नाबाद 44 धावांची खेळी केली. खेळ संपायला काही वेळ असताना अफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रवीचंद्रन आश्विनने 69 धावात 4 बळी घेतले, तर उमेश यादवने 37 धावा देत 3 बळी घेतले. शमीने 2, जडेजाने 1 बळी टिपला.

 संक्षिप्त धावफलक :

 भारत पहिला डाव 5 बाद 601 घोषित

 दक्षिण आफ्रिका पहिला डाव सर्वबाद 275 : केशव महाराज (72  धावा, 12 चौकार), फाफ डुप्लसिस (64 धावा, 9 चौकार, 1 षटकार), वर्नल फिलेंडर (नाबाद 44 धावा, 6 चौकार) रवीचंद्रन अश्विन (4/69), उमेश यादव (3/37) 

चाहता नतमस्तक होताना रोहित पडतो तेव्हा…

 क्रिकेटला एखाद्या धर्माचे स्वरूप असलेल्या भारतासारख्या देशात क्रिकेटपटूंकडे देव म्हणून पाहणे हे नवीन नाही. याच क्रिकेटवेडातून मग अनेकदा विचित्र प्रकार घडतात. आज पुन्हा याचा प्रत्यय आला. खेळ सुरू असताना रोहित शर्माचा एक चाहता अचानक मैदानात घुसला आणि रोहितपुढे नतमस्तक झाला. अचानक पायावर आलेल्या या चाहत्याला चुकवण्याच्या प्रयत्नात रोहितचा तोल गेला आणि तोही खाली पडला. मैदानातील या विचित्र क्षणाचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. 

प्रेक्षकांची गर्दी

 पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी मैदान प्रेक्षकांनी भरलेले होते. शनिवारी 13 हजार प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थीही होते. 

फॉलोऑनचा निर्णय अद्याप नाही : आश्विन

 दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन द्यायचा की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही टिपिकल इंडियन विकेट असल्याचे भारताचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने कसोटीचा तिसरा दिवस संपल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अफ्रिकेच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत बॅटिंग केल्यावर हताश झाला होतात का, असे विचारल्यावर तो म्हणाला, आम्ही अजिबात हताश झालो नव्हतो. अफ्रिकेचे खेळाडू 11 व्या क्रमांकापर्यंत बॅटिंग करतात. इतर टीममध्येही सध्या हीच स्थिती आहे. दुसऱया दिवशी उमेश यादव आणि शमीने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे आम्ही सामन्यावर नियंत्रण मिळवले. 

 चौथा आणि पाचवा दिवस आव्हानात्मक : बवुमा

 दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बवुमा म्हणाला, आमची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे आमच्यावर दडपण आले. महाराज आणि फिलेंडर यांनी चांगली भागीदारी केली. आमच्यासाठी चौथा आणि पाचवा दिवस कसोटी आणि मालिका वाचवण्यासाठी आव्हानात्मक असेल.