|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मतभेद मिटवण्याचा दोन्ही पंतप्रधानांचा निर्धार

मतभेद मिटवण्याचा दोन्ही पंतप्रधानांचा निर्धार 

अनौपचारिक शिखर परिषदेची यशस्वी सांगता 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील दुसरी अनौपचारिक शिखर परिषद यशस्वी ठरली आहे. कोणत्याही छोटय़ामोठय़ा तणावांचे रुपांतर मोठय़ा समस्येत न करण्यावर एकमत झाले. तसेच असे प्रसंग निर्माणच होऊ नयेत याकरता मतभेद मिटवण्यावर उपाययोजना करण्यावर भर देण्याचे ठरले. या दोघांनी जवळपास 90 मिनिटे एकमेकांशी थेट चर्चा करत भारत आणि चीन संबंधातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या या शिखर परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारचे करार करण्यात आले नसले तरी व्यापक चर्चेतून पुढील काळात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणे आणि व्यापारी तसेच द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर देण्यासाठी करारमदार केले जाऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

तर या 24 तासांच्या कालावधीमध्ये जवळपास 6 तास चर्चा होऊनही काश्मीरबाबत तसेच पाकिस्तानविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. भारत याबाबत दुसऱया देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही, याची जाणीव झाल्याने चीननेही फारसा आग्रह धरला नसल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. दोन्ही देशांनी सीमेवर शांतता स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले. लडाख केंद्रशासित करण्यावरुन चीनने आक्षेप घेतला होता. तथापि यामुळे दोन्ही देशांच्या सीमेबाबत कोणताही प्रश्न उदभवत नाही आणि तो भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. परिणामी या बैठकीमध्ये एकदाही लडाखचा उल्लेख करण्यात आला नाही. काश्मीरविषयावरुन चर्चा फिस्कटेल, असे भाकित वर्तवले जात होते. परंतु भारताच्या स्पष्ट धोरणामुळे हा विषयच निघाला नाही. उलट दहशतवादाला एकत्रित सामोरे जाऊन निःपात करण्याचेही ठरल्याचे गोखले यांनी सांगितले.

गोखले म्हणाले, या परिषदेमध्ये केवळ एकवेळच पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला तो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीन दौऱयावर आल्याचे शी जिनपिंग यांनी सांगितले. यावर पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. केवळ त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बैटकीमध्ये विश्व व्यापार संघटनेमध्ये सुधारणा, जलवायू परिवर्तनसाठी संयुक्त प्रयत्न, व्यापार तसेच अफगाणिस्तानच्या विषयावर चर्चा झाली. दहशतवादाविरोधातही व्यापक चर्चा झाली असून दहशतवादाचा बिमोड करण्यात दोन्ही देशांनी संयुक्त प्रयत्न करावेत, असा विषय चर्चेमध्ये झाला.

जिनपिंग यांनी पुढील अनौपचारिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱयाचे निमंत्रण दिले असून लवकरच याबाबतचे  वेळापत्रक ठरवण्यात येईल. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले असल्याचेही गोखले यांनी सांगितले.

दरम्यान, जिनपिंग हे भारत दौऱयामध्ये काश्मीरप्रश्नाबाबत भारताकडे विचारणा करतील, अशी अपेक्षा पाकिस्तान ठेवून होता. तथापि त्याचा कोणताही उल्लेख न झाल्याने या पाकिस्तानचा अपेक्षा भंग झाला आहे. यामुळे त्यांचा जळफळाट वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

आपल्यातील मतभेद विवाद होऊ नयेत. आपण एकमेकांच्या चिंता समजून आहोत. दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध जगासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल. भारत आणि चीनमध्ये 2 हजार वर्षांची मैत्रीची परंपरा आहे. तसेच रणनैतिक संवादालाही यामुळे चालना मिळाली आहे.

शी जिनपिंग म्हणाले,

भारतामध्ये झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने आपण भारावून गेलो आहोत. भारत आणि चीन महत्त्वपूर्ण शेजारी आहेत. या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील. चीनमधील माध्यमांनीही या परिषदेचे चांगले व सकारात्मक वार्तांकन करुन द्विपक्षीय संबंध सुधारणेतील मोठे पाऊल असे वर्णन केले आहे.