|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » युतीच्या सरकारने राज्याची लावली वाट

युतीच्या सरकारने राज्याची लावली वाट 

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा आरोप: बार्शीत राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा

 

प्रतिनिधी/बार्शी

छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मागून सत्तेत आलेले सेना-भाजप युतीच्या सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. राज्यातील विकास दर खालावला आहेच तर राजकारणाची पातळी पण घटवली आहे. त्यामुळे आता हे सरकार घरी बसवण्याची वेळ आली आहे. तेव्हा राज्यात महाआघाडीच्या सरकारसाठी काळजीपूर्वक मतदान करा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.

बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ बार्शी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार नीरंजन भूमकर, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, माजी आ. राजन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मोहसीन शेख, लंकेश चव्हाण, सोमनाथ तांदळे,  पुणे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शलाखा मरोड, जीवन आरगडे, विक्रम सावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पवार यांनी बार्शीचा उल्लेख करीत बार्शी ही शब्द पाळणारी बार्शी म्हणून मला परिचित आहे. त्यामुळे भूमकर रूपाने शब्द पाळा, असेही सांगितले. पुढे बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्री हे राज्यात राजकारणात कुस्तीसाठी पैलवान शिल्लक राहिला नाही, असे सांगत आहेत. पण कुस्ती ही पैलवानाबरोबर करायची असते, नामर्दाशी नसते असे सांगत आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला.

राज्यात 16 हजार शेतकऱयांनी आपले जीवन संपविले आहे. बेरोजगारी वाढली आहे, महिलांवर अत्याचार वाढले आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत. अशा गंभीर अवस्थेत महाराष्ट्र सापडला आहे. यामुळे राज्यात सरकार परिवर्तन झालेच पाहिजे, असे आवाहन केले. आता शेती करताना संपूर्ण कुटुंबाने शेती न करता कुटुंबातील

काही सदस्यांनी नोकरी किंवा उद्योग करावा, असा सल्ला दिला. आज राज्यात एवढे प्रश्न असताना केंद्रीय गृहमंत्री मात्र इथे येऊन 370 कलमची गोष्ट करतात, हे दुर्दैवी आहे.

———-

पवारांनी ईडीलाही फोडला घाम

शालाखा मरोड यांनीही भाषण केले. त्यात त्यांनी पवार साहेबांची स्तुती करत ईडीलाही घाम फोडला आहे, असे सांगितले. यावेळी उमेदवार नीरंजन भूमकर यांनीही आपल्या भाषणात विजयी करावे, असे आवाहन केले.

यावेळी विक्रम सावळे यांनी केलेल्या भाषणात बार्शीत आता राऊत आणि सोपल यांना नवा पर्याय मिळाला आहे, ही संधी गमावू नका, असेही सांगितले. जीवन आरगडे यांनी मनोगत व्यक्त केले.