|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर

रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर 

प्रतिनिधी/ सांगली

नाटय़क्षेत्रातील सर्वोच्च मानाचे मानले जाणारे आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत या पुरस्काराची घोषणा केली.

प्रत्येकवर्षी पाच नोव्हेंबर रंगभूमीदिनी या गौरव पदकाचे नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते वितरण करण्यात येते. रोहिणी जयदेव हट्टंगडी या रंगभूमी व चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्या गेल्या 48 वर्षांपासून रंगभूमीची अविरत सेवा करत आहेत. सन 1971 साली दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. या काळात त्यांनी विविध भाषांमधील नाटकांमधून कामे पेली. रिचर्ड अँटनबरोनिर्मित गांधी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबा गांधी या भूमिकेने त्या जगभरात गाजल्या. त्यांनी अनेक नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या असून सहा तेलुगू चित्रपटात देखील काम केले आहेत. याशिवाय हिंदी व मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. चार दिवस सासूचे या मालिकेतील अभिनयाव्दारे त्या महाराष्ट्रात घरोघरी पोहोचल्या आहेत. अशा ज्येष्ठ अभिनेत्रीला रंगभूमीदिनी विष्णुदास भावे नाटय़ विद्यामंदिर येथे सायं. पाच वाजता अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हट्टंगडी दाम्पत्याने कलाश्रय ही नाटय़ाभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली असून या संस्थेतर्फे त्यांनी वाडा भवानी आईचा, अपराजिता अशा नाटकांमध्ये वैशिष्टय़पूर्ण भूमिका केल्या आहेत. अक्कल धावते घोडय़ापुढे, ऋतुगंध, कस्तुरीमृग, एकच प्याला, खंडोबाचं लगीन, चांगुणा, जंगलातला वेताळ, दिल्या घरी तू सुखी रहा, भ्रमाचा भोपळा, मेडिया, मंतरलेले पाणी, लपंडाव अशा सुमारे 46 नाटकांमध्ये त्यांनी भूमिका बजावल्या. त्याचबरोबर अग्निपथ, गांधी, मुन्नाभाई एम.बी.बी.एस, सरकार तीन, विनय एक वादळ, मन वरालु, सितारामय्या, माने अशा हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड सुमारे 17 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. दूरचित्रवाणीवरील आप के दिवाने है, क्या हादसा क्या हकीकत, विरासत, चार दिवस सासूचे, वाहिनीसाहेब, सख्या रे, होणार सून मी या घरची, तुझं माझं ब्रेकअप या मालिकांतून त्या प्रेक्षकांच्या गळय़ातील ताईत बनल्या आहेत.

त्यांना यापूर्वी एनएसडीचा बेस्ट ऍक्ट्रेस ऍवॉर्ड, महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत चांगुणा या मध्यवर्ती भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सन 2009चा बालगंधर्व पुरस्कार, कस्तुरीमृग या व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच बालगंधर्व परिवारातर्फे जून 2017 रोजी जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. यापूर्वी चंद्रकांत गोखले, डॉ. लक्ष्मणराव देशपांडे, प्रसाद सावकार, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल, विक्रम गोखले, जयंत सावरकर, मोहन जोशी, मोहन आगाशे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण सोहळय़ास सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शरद कराळे यांनी केले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह ऍड. विनायक ताम्हणकर, कोषाध्यक्ष मेधा केळकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, विलास गुप्ते उपस्थित होते.

मानाचा पुरस्कार : रोहिणी हट्टंगडी

मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद झाला. इतकी वर्षे मी केवळ भावेंबद्दल वाचले होते. त्याच्याबद्दल मला आदर आहे. हा पुरस्कार देऊन मला निवडकर्त्यांनी मोठय़ा लोकांच्या रांगेत नेवून बसवले. या पुरस्कारने मला रंगभूमीवर केलेल्या कामाची दाद मिळाली. ऐंशीच्या दशकात कस्तुरीमृग नाटकाच्या प्रयोगासाठी सांगलीत आले होते. त्यानंतर नाटय़शिबिराच्या निमित्ताने येथे येण्याची संधी मिळाली होती. रंगभूमी क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार असल्याचे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा उचित गौरव : प्रा. वैजनाथ महाजन

रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत उचित आणि नाटय़क्षेत्राला आनंद देणारी आहे, असे निश्चित म्हणता येईल. मराठी नाटक, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट, त्यानंतर अनेक लक्षणीय मालिका, अशी त्यांची भरगच्च कारकीर्द आहे. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘कस्तुरीमृग’ या नाटकातील त्यांची भूमिका आजही नाटय़रसिकांना स्मरते आहे. त्या चित्रपटात जरूर रमल्या, पण मराठी रंगभूमीला क्षणभरही विसरल्या नाहीत. अत्यंत परमोच्चक्षणी त्यांना हा सन्मान होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. त्यांच्याबरोबरच निवड समितीचे पण अभिनंदन, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केली.