|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचरा प्रकल्पाच्या विस्तारास साळगाववासियांचा विरोध

कचरा प्रकल्पाच्या विस्तारास साळगाववासियांचा विरोध 

प्रतिनिधी/ म्हापसा

साळगाव कचरा प्रकल्पावर सध्या 100 टन कचरा येतो त्याचा विस्तार 250 टन करण्याचा कट कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी आखला आहे. या कचरा प्रकल्प विस्ताराला साळगाववासियांचा तीव्र विरोध आहे. सध्याच येथे दुर्गंधी पसरली असून 250 टनाचा कचरा प्रकल्प विस्तार केल्यास येथील नागरिकांना राहणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे कोणत्याच परिस्थिती साळगाव कचरा प्रकल्पाचा विस्तार करु देणार नाही, असा इशारा साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी दिला. इतकेच नव्हे तर मंत्री लोबो यांनी कांदोळी सिकेरी येथे कॅसिनो आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. प्रत्यक्षात ते नेरुल नदीत कॅसिनो आणू पाहत आहे. आपण त्यांना आवाहन देतो हिमत असेल तर मंत्री मायकल लोबो यांनी या परिसरात कॅसिनो आणून दाखवावा. आम्ही सर्व साळगाववासिय त्या विरोधात नेरुल नदीत पाण्यात उभे राहून कॅसिनोला विरोध करणार, असे स्पष्ट केले.

आमदार जयेश साळगावकर यांनी जाहिररित्या आपला राग व्यक्त केला. आपण उद्या आमदार असेन नसेन, राजकारण ही आपली सेवा आहे तो व्यवसाय नाही. उद्या आपण आमदार नसलो तरी आम्ही साळगाववासिय सदैव या कचरा प्रकल्प विस्ताराला विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री लोबो आपल्या विरोधात नाहक बदनामी करत आहे. आपण त्यांच्या विरोधात आजवर काहीच बोललो नाही. कळंगूटचा वेश्या व्यवसाय, शेती सर्व बुजविली, नगरनियोजन खात्यातील भ्रष्टाचार याकडे आपण बोट दाखविले नाही. त्याबाबत आपणास बोलायचे नाही. आम्हाला साळगाववासियांची चिंता आहे. मंत्री लोबो यांनी लोकांच्या आयुष्याशी खेळू नये, असे आवाहन जयेश साळगावकर यांनी केले.

साळगाव अतिसुंदर राखून ठेवूया

250 टन कचरा प्रकल्प आणण्यास आम्ही एकत्रित येऊन विरोध करुया. यासाठी रस्त्यावर येण्यासही मागे राहू नये. साळगाव अतीसुंदर गाव आहे. तो राखून ठेवूया, असे तुलियो डिसोझा म्हणाले.

10 पंचायतींचा कचरा आता 30 वर गेला

माजी सरपंच एकनाथ ओरसकर म्हणाले की, 54 हजार टन कचरा 2012 साली पडून होता. तो पावसात वाहून साळगावात येत होता. 2013 साली 75 टन झाला. सरकारने येथे प्रकल्प् उभारण्याचे ठरविले. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कचरा प्रकल्प फक्त 10 पंचायतीसाठी असल्याचे स्पष्ट केले होते मात्र आता 30 वर गेला आहे. साळगाववासिया या प्रकल्पाच्या विस्तारीकरणास विरोध करीत आहोत.

आता रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही

आम्ही प्रसंगी रस्ता अडवू, तेव्हाच सरकारला जाग येईल. आम्ही सर्व एकत्रित येऊन येथे कचरा घेऊन येणाऱया गाडय़ा बंद करुया. कोमुनिदादने ना हरकत दिला नसून उलट आम्ही सदैव या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. कचरा प्रकल्प विस्ताराला कायमचा विरोध दर्शविण्यासाठी आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे साळगाव कोमुनिदादचे अटर्नी ऑस्टीन डिकुन्हा म्हणाले.

कचरा विरोधात पंचायतीतही ठराव

सरपंच श्रद्धा बोरकर म्हणाल्या की, आम्हाला साळगाव कचरा प्रकल्पाचा विस्तार नको. 100 टन क्षमता असताना आम्हाला त्रास होतो आहे. सालमोना झरीकडे पाणी जीर्ण होते. 250 टन कचरा केला तर आम्हाला त्रास होणार. प्लास्टिक जाळण्याचा प्रकल्प घातल्यास येथे सर्व दुषित होणार असल्याने सरकारने कचरा प्रकल्प 100 टनच ठेवावा.

दुसऱयांचा कचरा आमच्या डोक्यावर का?

साळगावचे माजी सरपंच भोलानाथ घाडी म्हणाले की, प्रकल्पात घाण वाढत आहे. आता 100 सोडून 250 टन कचरा प्रकल्प घालू पाहत आहे. शिवाय प्लास्टिक जाळण्याचा प्रकल्प आणू पाहत आहे. यामुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. इतरांचा कचरा आमच्या डोक्यावर नको. इथे दुर्गंधी येते, शाळकरी मुलांना त्रास होतो. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे व हा प्रकल्प बंद करावा, असे ते म्हणाले.

आम्हाला साळगाव कचरा प्रकल्प नको

कळंगूट सिटीझन फोरमचे प्रेमानंद दिवकर म्हणाले की, साळगावात कचरा प्रकल्प आल्याने जमिनीतील पाणी दुर्गंधीत झाले आहे. त्यामुळे आहे तेवढय़ाच क्षमतेचा कचरा प्रकल्प असावा अन्यथा कचरा प्रकल्पच नको. सर्वांनी एकत्रित येऊन याला विरोध करुया.

माजी आमदार, सरपंच, पंचांनी तेव्हाच विरोध करायला हवा होता

प्रदीप पाडगावकर म्हणाले की, हा प्रकल्प आज साळगाववासियांवरच उलटला आहे. हा प्रकल्प उभारताना तत्कालीन आमदार दिलीप परुळेकर, माजी सरपंच एकनाथ ओरसकर, दीपक राणे यांनी त्यावेळीच विरोध करायला हवा होता. 2004 साली या प्रकल्पास विरोध दर्शविला असता तर आज ही परिस्थिती झाली नसती.

साळगाव पठरावर विरोध दर्शविण्यासाठी अरुण सामंत, सेव्ह गोवाचे समन्वयक रमेश घाडी, माजी सरपंच जॅक कुयेलो, लाफीरा गोम्स, पिळर्ण पंच सुवर्णसिंग राणे, ऍशली डिनेनी, डिना क्रूझ, मारिओ कुरदेरो यांनी आपले विचार मांडले.

स्वागत साळगाव सरपंच श्रद्धा बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन दीपक राणे यांनी केले.