|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाणावलीतून ‘लमाणी’ हटाव मिशन सुरू

बाणावलीतून ‘लमाणी’ हटाव मिशन सुरू 

प्रतिनिधी/ मडगाव

बाणावलीतून लमाणी हटाव मिशन ‘बाणावलीकरांचो उलो’ या संस्थेने सुरू केले असून काल शनिवारी ग्रांद पुलवाडो-बाणावली येथील जागृती बैठकीतून प्रारंभ झाला. लमाणींना भाडेपट्टीवर दुकान न देणे, भाडेकरू म्हणून ठेवताना पूर्ण काळजी घेणे तसेच त्यांना जमिनी विकू नये अशी विनंती या जागृती बैठकीतून करण्यात आली.

सद्या बाणावलीत स्थानिक ग्रामस्थ व लमाणी यांच्यात संघर्ष निर्माण झालेला आहे. या संदर्भात स्थानिकांनी बाणावली पंचायतीला निवेदन सादर केले आहे. या निवेदना अनुसरून पंचायत मंडळाची 15 ऑक्टोंबर रोजी बैठक बोलावण्यात यावी. त्यानंतर असाधारण ग्रामसभा बोलावून लमाणीच्या विषयांवर गांभीर्याने चर्चा करणे व ग्रामसभेला सर्व बाणावलीकरांनी उपस्थिती लावणे आणि नंतर दांडो मैदानावर भव्य अशी जाहीर सभा घेऊन लमाणींना हटविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती ‘बाणावलकारांचो उलो’चे निमंत्रक जुझे फर्नांडिस यांनी दिली.

लमाणींना काम करण्यास कोणीच रोखलेले नाही. मात्र, त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडू नये, जर मर्यादा ओलांडल्या तर त्याला त्याच शैलीत उत्तर देण्यात येईल असे या जागृती बैठकीत सांगण्यात आले. आज बाणावली पंचायत क्षेत्रात लमाणींची संख्या 200 ते 300च्या आसपास असून बाणावली पचायतीने त्यांच्यावर कोणतेच निर्बंध घातले नसल्याने, त्याच परिणाम स्थानिक लोकांना भोगावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बाणावली परिसरातील असंख्य युवक आज नोकरी निमित्त विदेशात आहे. आज ना उद्या ते परत येतील, त्यावेळी त्यांच्यासाठी येथील जमिन शिल्लक राहिली पाहिजे. ते व्यवसाय करतील. त्यांना तशी संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे लमाणींना जमिनी विकू नका तसेच भाडेपट्टीवर धंदा करण्यास संधी देऊ नका असे आवाहन करण्यात आले. स्थानिकांवर कोणी अन्याय केला तर तो खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

लमाणींमुळे बाणावली गावांतील शांतता भंग होत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. रात्री-अपरात्री लमाणी वावरत असतात. दारूच्या नशेत भांडणे करतात. त्यामुळे गावांतील शांततेला ठेच पोचत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी आत्ता जागृत होण्याची वेळ आली असून लमाणी हटाव मिशन आत्ता मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मिशनला सर्वांनी सहकार्य व पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले.

या जागृती बैठकीत ग्रेफरी फर्नांडिस, सेबी यांनी आपले विचार मांडले. लमाणी लोकांशी आमचा वाद नाही. मात्र, त्यांनी आपल्या मर्यादेत राहून काम करावे, त्यांच्या पासून स्थानिकांना त्रास होता कामा नये, जर तसा प्रयत्न झाला तर तो खपवून न घेण्याचा इशारा देण्यात आला.