|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘मोबाईल ऍप’चा आदेश मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू

‘मोबाईल ऍप’चा आदेश मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू 

प्रतिनिधी/ मडगाव

विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी गोव्यातील बार व तावेर्न मालकांना मद्याच्या खरेदी-विक्रीची माहिती दररोज ‘मोबईल ऍप’वर टाकण्याचे बंधनकारक करणारा अबकारी कर खात्याचा आदेश सरकारने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. जर हा आदेश मागे घेतला नाही तर गोव्यातील तमाम बार व तावेर्न मालकांना तसेच मद्य व्यावसायिकांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. पर्यटन व्यवसाय मंदीत आहे. अशावेळी सरकारने बार व तावेर्न व्यावसायिकांवर जाचक अटी टाकल्या तर त्याची झळ सामान्य व्यावसायिकांना बसेल. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी ‘ट्विट’ करून मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

गोव्यातील लहान बार व तावेर्न व्यवसाय हा मर्यादित मनुष्यबळावर चालतो. काही गोमंतकीयांचा हा वडिलोपार्जीत व्यवसाय असून, कुटूंबाचे सदस्य व घरची महिला हा व्यवसाय सांभाळते. त्यांना आधुनिक मोबाईल उपकरणे व ऍपबद्दल माहितीच नसते. सरकारने असले नियम व अटी लागू करण्याअगोदर संपूर्ण गोव्यात अखंडीत मोबाईल नेटवर्क सेवा देण्याची व्यवस्था करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगताना, सरकारने ते तंत्रज्ञान सामान्य लोकांना शिकविण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

जगप्रसिद्ध टॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ दिवाळखोरीत गेल्याने गोव्यात येणारे पर्यटक कमी होतील असा अंदाज असतानाच व त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसण्याचे संकट समोर उभे असताना, अबकारी खात्याने असा आदेश काढणे दुर्दैवी आहे. शॅक व्यावसायिकसुद्धा अडचणीत आहेत हे सरकारने ध्यानात ठेवावे असे म्हटले आहे.

Related posts: