|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वेस्टेशन येथील गुड्सशेडचे देसूर येथे होणार स्थलांतर

रेल्वेस्टेशन येथील गुड्सशेडचे देसूर येथे होणार स्थलांतर 

बेळगाव  / प्रतिनिधी

दक्षिण-पश्चिम रेल्वेने बेळगाव येथील मुख्य रेल्वेस्थानकात असणारे गुड्सशेड आता देसूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागला असून 1 नोव्हेंबरपासून देसूर येथे गुड्सशेड स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ब्रिटिशकालीन असणारे गुड्सशेड आता इतिहासजमा होणार आहे.

शहराची व्याप्ती वाढत गेल्यामुळे गुड्सशेड शहराबाहेर हलवावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. देसूर की सांबरा असा पेच रेल्वे विभागासमोर होता. मागील वषी सांबरा येथे गुड्सशेड हलविण्यासाठी हालचाली सुरू होत्या. परंतु आता रेल्वे विभागाने देसूर येथेच गुड्सशेड होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गुड्सशेड रोड येथे होणार प्रवेशद्वार

गुड्सशेड हलविल्यानंतर या ठिकाणी प्रवेशद्वार होणार आहे. वडगाव, शहापूर, टिळकवाडी भागातून येणाऱया प्रवाशांना रेल्वेस्थानकावर जाणे सोपे होणार आहे. पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदतही होणार आहे. गुड्सशेड हलविल्यामुळे शहरातील अवजड वाहनांची वर्दळ काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे.

कामगारांची होणार पंचाईत

सध्या मालवाहतूक ही शहरातील रेल्वेस्थानकावरून होत असते. माल रेल्वेमध्ये चढविणे व ट्रकमध्ये भरणे यासाठी पाच्छापूर, सुलधाळ या भागातून रोज 1 हजार ते 1500 कामगार बेळगावमध्ये येत असतात. त्याचबरोबर शेकडो ट्रकची वर्दळ असते. आता गुड्सशेड हलविल्यामुळे कामगारांना देसूरपर्यंतचा अधिक प्रवास करावा लागणार आहे.

 

Related posts: