|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोलवा समुद्रकिनाऱयाच्या सौंदर्यीकरणाचे वाजले तीन-तेरा

कोलवा समुद्रकिनाऱयाच्या सौंदर्यीकरणाचे वाजले तीन-तेरा 

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यातील सर्वात लोकप्रिय असलेल्या कोलवा समुद्रकिनाऱयाच्या सौंदर्यीकरणाचे काम केंद्र सरकारच्या कोस्टल सर्किट स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत हातात घेण्यात आले होते. पण हे काम जवळपास ठप्प झाले असून या सौंदर्यीकरणाचे सद्या तीन-तेरा वाजले आहेत. गोव्यात नव्या पर्यटन हंगामाला प्रारंभ झाल्याने हा समुद्रकिनारा पर्यटनासाठी सज्ज व्हायला पाहिजे होता. मात्र, सद्या तशी कोणतीच परिस्थिती या ठिकाणी नाही.

पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी गेल्या वर्षी 10 जुलै 2018 रोजी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्या उपस्थितीत 13.87 कोटी रुपयांच्या पर्यटन पायाभूत सुविधा विकास प्रकल्पास सुरवात केली होती. मात्र, सद्या या प्रकल्पाचे काम बंद पडलेले असून कोलवा समुद्रकिनाऱयाची शान त्यामुळे हरवली आहे.

आराखडय़ामध्ये आहेत अनेक सुविधा

एकूण 18.87 कोटी रुपयांपैकी कोलवा समुद्रकिनाऱयावरील पायाभूत सुविधांवर 11.67 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ज्यात कोलवा समुद्रकिनाऱयाला जोडणाऱया रस्त्याचे सुशोभिकरणाचा समावेश आहे. विद्यमान वाहतूक बेटाचे सौंदर्यीकरण, रस्ते, गटारे इत्यादीचा त्यात समावेश आहे. पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी खोल्यांसह, शौचालय बांधणे, 80 चारचाकी वाहनासाठी पार्किंग, 327 दुचाकी वाहनांसाठी पार्किंग, 54 बस वाहनांसाठी पार्किंग तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची उपकरणे (प्ले क्षेत्र) लँडस्केपिंग इत्यादीचा समावेश होता.

कामे अर्धवट असल्याने बकाल स्वरुप

सौंदर्यीकरणाचे काम अर्ध्यांवर बंद ठेवण्यात आल्याने, कोलवा समुद्रकिनाऱयाकडे येणाऱया वाहनाना समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाहतूक बेटाचे काम पूर्ण झाले नसल्याने, वाहने वळविताना बरीच कसरत करावी लागते. सर्वच कामे अर्धवट स्थितीत असल्याने निर्सगाने उधळण केलेल्या या समुद्रकिनाऱयाला बकाल स्वरूप आले आहे.

शौचालय बंद असल्याने पर्यटकांची गैरसोय

समुद्रकिनाऱयावर येणाऱया पर्यटकांसाठी वॉशरूम, कपडे बदलण्याचा रूम तसेच स्वच्छ पाण्याची आंघोळ करण्यासाठी तरतूद असली तरी या गोष्टी देखील उलपब्ध झालेल्या नाहीत. या ठिकाणी असलेले शौचालय तर गेल्या सहा महिन्यापासून बंदच आहे. यामुळे महिला वर्गाची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.

बाणावली किनाऱयावरीलही काम थंडावले

बाणावली समुद्रकिनाऱयावर 2.20 कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधांमध्ये समुद्रकिनाऱयावर बसण्याची व्यवस्था तसेच 102 चारचाकी वाहनांसाठी पार्किग, 122 दुचाकी वाहनांसाठी पार्किंग, लँडस्केपींग आणि रोषणाई इत्यादीचा समावेश आहे. सद्या बाणावली समुद्रकिनाऱयावरील काम ही थंडावले आहे.

सद्या पर्यटन हंगाम सुरू झाला असला तरी विदेशी पर्यटकांची पावले अद्याप या समुद्रकिनाऱयाकडे वळलेली नाहीत. दर शनिवार व रविवार स्थानिक पर्यटक गर्दी करतात. पण, या गर्दीत विदेश पर्यटक कुठेच आढळून येत नाहीत. स्थानिक पर्यटकांमुळे गर्दी होत असली तरी ते पर्यटक व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरत नसल्याची माहिती स्थानिक व्यापाऱयांनी दिली.

सरकारने अगोदर सौंदर्यीकरणाचे काम शक्य तेवढय़ा लवकर पूर्ण करावे व कोलवा समुद्रकिनाऱयाची शान वाढवावी, जेणे करून पर्यटक या ठिकाणी भेट देतील व त्यातून पर्यटन व्यवसायाला तेजी मिळणार असल्याची माहिती स्थानिक विक्रेते देतात.

Related posts: