|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निलजी येथील युवकाचा खड्डय़ात बुडून मृत्यू

निलजी येथील युवकाचा खड्डय़ात बुडून मृत्यू 

वार्ताहर / सांबरा

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भातशेताची पूजा करायला गेलेल्या युवकाचा बांधावरून पाय घसरून पाणी भरलेल्या खड्डय़ात पडल्याने बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना निलजी येथे रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली.

पुन्नाप्पा कल्लाप्पा मण्णूरकर (वय 35) रा. तानाजी गल्ली निलजी असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याबाबत मारिहाळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुन्नाप्पा हा रविवारी सकाळी कोजागिरी पौर्णिमा असल्याने आपल्या भातशेताची पूजा करण्यासाठी आपला मुलगा कुणालला सोबत घेऊन गेला होता. आपण एका शेताकडे तर कुणालला दुसऱया शेताकडे पाठविले होते. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे निलजी शिवारातील बांध वाहून गेले आहेत. गावच्या उत्तरेकडे असणाऱया विठ्ठणभाव शेताकडे जाणाऱया वाटेवरील बांध वाहून जाऊन शिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुन्नाप्पा त्या पाण्यातूनच वाट शोधत जात असताना पाय घसरून पाण्यात बुडाला. पुन्नाप्पाला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्या बांधानजीक पावसाचे पाणी जाऊन दहा ते बारा फुटाचा खड्डा निर्माण झाला असून चिखल साचल्यामुळेच सदर घटना घडल्याचे बोलले जात आहे. मयत पुन्नाप्पा सेंट्रिंगचा व्यवसाय करत शेतीही सांभाळत होता.

दरम्यान काम आटोपून मुलगा कुणाल घरी परतला. परंतु वडील घराकडे न आल्याने शेताकडे पहायला गेले असता सदर घटना उघडकीस आली. गावातील काही तरुणांनी त्या पाण्यात शोधमोहीम सुरु केल्यानंतर तब्बल सात तासानंतर मृतदेह सापडला. पुन्नाप्पा हे मनमिळावू व मेहनती होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांचेही शेतात अपघाती निधन झाले होते.

मारिहाळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

Related posts: