|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डॉक्टर-नातेवाईकांमध्ये ‘सिव्हील’मध्ये राडा

डॉक्टर-नातेवाईकांमध्ये ‘सिव्हील’मध्ये राडा 

मोबाईलवर फोटो काढल्याचा संशय

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री रुग्णाचे नातेवाईक व एका वैद्यकीय अधिकाऱयामध्ये जोरदार राडा झाला. फोटो काढल्याच्या संशयावरून  वैद्यकीय अधिकाऱयाने रुग्णाच्या नातेवाईकाचा मोबाईल हिसकावून घेत फोडल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी वैद्यकिय अधिकाऱयाच्या कानाखाली देत त्यांचा  मोबाईल फोडून ‘फिट्टमफाट’ केली. या राडय़ाने रुग्णालयातील वातावरण तणावाचे बनले होते. 

   रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. छोटय़ा जखमी मुलाला घेऊन त्याची आई उपचारासाठी रूग्णालयात आली होती. अपघात विभागात दाखल केलेल्या या मुलाची तपासणी करून वैद्यकिय अधिकाऱयाने कर्मचाऱयांना ड्रेसिंग करण्याच्या सूचना केल्या. उपचारादरम्यान जखमी मुलाचे वडील अपघात विभागात दाखल झाले आणि तेथेच वादाला तोंड फुटले.

  वैद्यकीय अधिकाऱयाने बाहेर काढल्याने मुलाचा बाप संतापला होता. वैद्यकीय अधिकारी त्या मुलाच्या केस पेपरवर नोंद करत असताना मुलाच्या वडिलांनी फोटो काढल्याचा संशय आला. या संशयावरून वैद्यकीय अधिकाऱयाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत जोराने जमीनीवर आदळला. वैद्यकीय अधिकाऱयाने मोबाईल फोडल्याने वडिलांसोबतचे नातेवाईकही संतप्त झाले. त्यांनाही संधीत अधिकाऱयाला धक्काबुक्की करत, त्याचा चा मोबाईलही आपटून फोडून ‘मोबाईलचा बदला’ घेतला.

  या राडय़ाने रुग्णालयात चांगलीच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीतील कर्मचाऱयांनी शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण अपघात विभागात दाखल झाले.

  रात्री उशिरापर्यंत या प्रकाराबाबत चौकशी केली जात होती. मात्र दोन्ही बाजूकडून कोणतीही तक्रार न झाल्याने या प्रकारणावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

 

Related posts: