महाराष्ट्राचे सुपूत्र एस. ए. बोबडे होणार सरन्यायाधीश

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर मराठी असलेले वरिष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे अर्थात एस. ए. बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, अशी शिफारस गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. आता ते 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश बोबडे यांची शिफारस त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी केली आहे.
बोबडे यांचा 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात जन्म झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू देखील आहेत.
कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपली प्रॅक्टीस सुरु केली. 1978 मध्ये ते महाराष्ट्र बार काऊन्सिलचे सदस्य बनले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी काम सुरु केले. मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची सन 2000 मध्ये नियुक्त झाली. मधल्या काळात मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश झाले. न्या. एस. ए. बोबडे हे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी कार्यरत असलेले दुसरे सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्या. कपाडिया हे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर कार्यरत होते.