|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » शुल्क आकारणीचा पाकचा हेका कायम

शुल्क आकारणीचा पाकचा हेका कायम 

भारताकडून दरवर्षी कमविणार 259 कोटी

वृत्तसंस्था/ जालंधर

 शिखांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी निर्माण करण्यात आलेल्या मार्गिकेचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने चालविला आहे. भारतातून दाखल होणाऱया शिख भाविकाकडून 20 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1420 रुपये आकारण्याच्या मागणीवर पाकिस्तान अडून बसला आहे. भारताने अनेकदा आवाहन करूनही पाकने हे शुल्क हटविण्यास नकार दिला आहे.

शुल्क भरल्याशिवाय भाविकांना तीर्थस्थळी जाऊ देणार नसल्याचे इम्रान सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानने प्रतिदिन 5 हजार भाविकांना कर्तारपूर साहिब येथे प्रवेश करण्याची अनुमती दिली आहे. दरवर्षी 18 लाख शिख भाविक जाणार असल्याने पाकिस्तानला 259 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. शिख भाविकांना व्हिसाशिवाय दर्शन करता येणार असले तरीही पारपत्र दाखवावे लागणार आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत कार्यपूर्ती

4.2 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेची निर्मिती शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या एक आठवडय़ापूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. कर्तारपूर गुरुद्वारा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्हय़ात आहे. गुरदासपूर येथील डेरा बाबा नानक येथील सीमेपासून 4.5 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.

शुल्क आकारणी का?

जगभरातील कुठल्याच गुरुद्वारात जाण्यासाठी शुल्क भरावे लागत नाही. शुल्काचा आकडा मोठा असल्याने मोठय़ा संख्येतील शिख भाविक कर्तारपूरला जाऊ शकणार नाहीत. तसेही भाविकांकडून शुल्क आकारणे अयोग्य आहे. भारत सरकारने इम्रान खान यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा अशी सूचना शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख गोविंद सिंग लौंगोवाल यांनी केली आहे.

मुख्य अतिथी होण्यास नकार?

माजी पंतप्रधान मनमाहन सिंग यांनी कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाशी संबंधित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होण्याचे पाकचे निमंत्रण फेटाळले आहे.  एका सामान्य नागरिकाप्रमाणे कर्तारपूर येथे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान 9 नोव्हेबर रोजी अधिकृत स्वरुपात या मार्गिकेचे उद्घाटन करणार असल्याची माहिती त्याचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दिली आहे.

Related posts: