|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कमलेश तिवारी हत्याप्रकरणी तिघांना अटक

कमलेश तिवारी हत्याप्रकरणी तिघांना अटक 

गुजरात पोलीस दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

वृत्तसंस्था/ सुरत

हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तिघांना सुरतमध्ये अटक केली आहे. अवघ्या चोवीस तासात हल्लेखोरांना अटक केली असली तरी तिवारी यांच्या मुलाने मात्र या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला जावा, स्थानिक पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. तर अन्य दोघांना लवकरच गजाआड केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी तिवारी यांची गोळय़ा झाडून आणि गळा चिरुन निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर लखनऊसह संपूर्ण उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत.त्यांचबरोबर त्यांच्या मुलाला परवानायुक्त शस्त्र देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या निवडणूक प्रचारासाठी मुंबई दौऱयावर आहेत. ते परतल्यावर त्यांच्या कुटुंबींयाना भेट देणार असल्याचे लखनऊचे मंडल आयुक्त मुकेश मेश्राम तसेच डीएम अखिलेश तिवारी यांनी सांगितले.

दरम्यान, गुजरात एटीएसने तिघा आरोपींना युपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुजरात एटीएसचे के. एस. पी. हिमांशु शक्ला आणि डीएसपी के. के. पटेल यांनी ही कारवाई केली. त्यानंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत डीजीपी ओपी सिंह यांनी या आरोपींची नावे रशीद अहमद पठाण, मौलाना मोहसीन शेख आणि फैजान रशीद अहमद पठाण अशी असल्याचे सांगितले. याशिवाय आणखी दोघांची नावे याप्रकरणात असून त्यांनाही लवकरच अटक करणार असल्याचे म्हटले आहे.

2015 साली मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांची देशभर चर्चा होती. त्यांच्या हत्या करणाऱया मुस्लिम समुदायाने बक्षीसही जाहीर केले होते. 2015 सालीच तिवारी यांच्या हत्येचा कट या तिघांनी रचला होता. पण रशीद दुबईला गेला. दोन वर्षांनंतर परतल्यावर त्यांनी पुन्हा कट आखला व 16 ऑक्टोबरला सुरतहून लखनऊला गेले, असे पटेल, शुक्ला यांनी सांगितले. ते म्हणाले, घटनास्थळी माठाईचा बॉक्स आढळून आला होता. त्यातील हत्यार सुरत मधील उधना येथून खरेदी केले होते. मृत तिवारीच्या फोनवरील संभाषणामुळे हे उघड झाले आहे, असेही त्या दोघांनी सांगितले

Related posts: