|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केवळ 5 ते 6 हजार सरकारी नोकऱया शक्य

केवळ 5 ते 6 हजार सरकारी नोकऱया शक्य 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

यानंतर गोव्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 हजार नोकऱया तयार करणे शक्य आहे. कारण सरकारी कर्मचाऱयांची आधीच गर्दी झालेली आहे. तुर्तास 55 ते 60 हजार कायमस्वरुपी कर्मचाऱयांची संख्या आहे. त्यामुळे यानंतर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगाव येथे आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना सांगितले.

ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे 50 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्धीच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सरकारी खात्यातील कायम नोकरीतील कर्मचाऱयाव्यतिरिक्त सरकारी खात्यामध्ये कंत्राटी पद्धतीने सुमारे 10 हजार कर्मचारी काम करीत आहेत. सरकारी खात्यामध्ये गर्दीची स्थिती आहे. त्यामुळे आणखी मोठय़ा प्रमाणात सरकारी खात्यामध्ये नोकरभरती करणे शक्य होणार नाही. त्यामुळे यानंतर आणखी केवळ 5 ते 6 हजार नोकऱया सरकारी खात्यात तयार करणे शक्य आहे.

या मेळाव्यात उपस्थित असलेल्या कंपन्यांनी नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. तीन हजारपेक्षा जास्त नोकऱया या कंपन्यामधून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. केवळ सरकारी नोकऱयांच्याच मागे लागू नये असेही ते म्हणाले. मानव स्रोत महामंडळामार्फत खाजगी क्षेत्रात नोकरभरती करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. किमान दहा हजार नोकऱया या क्षेत्रात उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. यानंतर कनिष्ठ कारकून, शिपाई पदासाठी आयोगामार्फत नोकरभरती केली जाणार आहे. आयोगामार्फत केल्या जाणाऱया भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहणार आहे. यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही. आजारी असलेले काही सरकारी कर्मचारी आजाराची सबब देऊन मोकळे होतात किंवा जबाबदारी झटकतात, मात्र जे सरकारी कर्मचारी सेवेत नियमित असणार नाही किंवा सेवेबाबत गंभीर असणार नाहीत त्यांना थेट घरी पाठविले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांना सुरक्षितता देण्याच्या दृष्टीनेही योजना आखली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

 

Related posts: