|Friday, December 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » धाडसी आईची गोष्ट हिरकणी

धाडसी आईची गोष्ट हिरकणी 

‘सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल…भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते’, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखर नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर घर करुन बसली आहे. राहून- राहून मनात प्रश्न उपस्थित राहतो की, तो कडा हिरकणी नेमकी कशी उतरली असेल कारण ’हिरकणी कडा उतरली‘ इतकंच वर्णन पाठय़पुस्तकात करण्यात आलं होतं. एका आईच्या धाडसाची ही गोष्ट हिरकणी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

पण खरं तर, तो कडा किती खोल होता याचा अनुभव हिरकणी चित्रपटाच्या टीमने घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो, असं वर्णन कडय़ाचं करण्यात आलं आहे. तसेच, दीड गाव खोल दरी असं देखील वर्णन करण्यात आले आहे. अंगावर शहारे येतील असं वर्णन जर कडय़ाचं करण्यात आलं आहे तर हिरकणी एका रात्रीत तो कडा कसा उतरली असेल, सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्रं होती म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता… पण तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील याचा विचार सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांनी केला.

प्रसाद ओक आणि त्यांचं 25 जणांचं युनिट यांनी रायगडावर जाऊन गडाची आणि त्या कडय़ाची पाहणी केली. त्या रात्री नेमके कसे आणि काय घडले असेल याचा अंदाज बांधण्यासाठी 25 जणांचं युनिट हिरकणी बुरुजावर भर पावसात गेलं होतं. साधी गवळण असलेल्या हिरकणीने कसं काय हे धाडस केलं असेल याचा विचार करून तिने उचललेले धाडसी पाऊल चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी चित्रपटात सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. फाल्गुनी पटेल या निर्मात्या आणि लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आहेत. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर आहेत. 24 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Related posts: