|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोयना धरणातून पाऊण फुटाने विसर्ग

कोयना धरणातून पाऊण फुटाने विसर्ग 

पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचे थैमान, 4 हजार 491 क्युसेक विसर्ग

प्रतिनिधी/ नवारस्ता

मुसळधार पावसाचे माहेरघर असणाऱया कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काही दिवसासाठी गायब झालेला पाऊस परतीच्या पावसाच्या स्वरूपात मुक्कामीच आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने गेले अनेक दिवसापासून बंद असलेले धरणाचे पायथा वीजगृह प्रथम कार्यान्वित केले. मात्र पावसाचा जोर अधिकच वाढल्याने रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता धरणाचे दोन वक्र दरवाजे 9 इंच म्हणजेच पाऊण फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 4 हजार या 491 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाची जलपातळी वाढत असल्याने कार्यान्वित करण्यात येत आहे.

  दरम्यान, संपूर्ण पाटण तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असल्याने नद्या ओढे यांना पूर आल्याने मतदानासाठी निघालेली कर्मचाऱयांची वाहनेही काही ठिकाणी मध्येच अडकून पडली आहेत.

कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्राच्या सर्वदूर ठिकाणी 17 मिलिमीटरपेक्षा जादा पाऊस झाला तर धरणाच्या जलपातळीत वाढ होते. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या कोयनानगर येथे 22 मिलिमीटर, नवजा येथे 19 मिलिमीटर, महाबळेश्वर येथे 35 मिलिमीटर तर नव्याने चर्चेत आलेल्या वलवण याठिकाणी 38 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे सात वेळा उघडे करण्यात आले आहेत. धरणातून 112 टीएमसी तर पायथा वीजगृहातून 8.62 टीएमसी असे एकूण 120 टीएमसी पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

   कोयना धरणाची जल पातळी 2163.05 फूट असून धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱया परतीच्या पावसामुळे धरणात येणाऱया पाण्याची आवक 12 हजार 131 क्युसेक असल्याने प्रथम धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून वीजगृहातून 2100 क्युसेक पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात आला मात्र रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढू लागल्याने कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे 9 इंच म्हणजेच पाऊण फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 4 हजार 491 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

    दरम्यान संपूर्ण पाटण तालुक्यात शनिवारी रात्रीपासून या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून ओढे, नद्या यांना पूर आला आहे. तालुक्यातील पाटण मल्हारपेठ, नवारस्ता, कोयना या बाजारपेठेतील अनेक दुकांन गाळ्यात, घरांत ओढय़ाचे रस्त्यावरील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतकऱयांच्या शेतात असणाऱया सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान असल्यामुळे मतदान अधिकारी, कर्मचारी यांना रविवारी घेऊन जाणारी काही ठिकाणी मध्येच रत्यावर अडकली. त्यामुळे तहसील कार्यालय आवारात आणि मतदान केंद्रावर गाडय़ा उशिरा पोहोचल्या. प्रचंड कोसळणाऱया या पावसामुळे मतदान अधिकायांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले.

मतदानावर परिणाम होण्याची शक्यता

शनिवारी व रविवारी पावसाचा जोर वाढल्याने कोयना नदीसह ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक वाडय़ा वस्त्यांमधील ओढे दुथडी भरून वाहत असल्याने काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. सोमवारी मतदान असून पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related posts: