|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मांडूळ तस्करीप्रकरणी आठजणांची टोळी जेरबंद

मांडूळ तस्करीप्रकरणी आठजणांची टोळी जेरबंद 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा व सांगली जिल्हय़ातील काही टोळय़ांकडून अंधश्रध्देपोटी वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱया टोळीची माहिती मिळाल्यानंतर सातारा व सांगली वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत खरसुंडी (ता. आटपाडी) येथे कारगणी रस्त्यावर मांडूळाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केल्यानंतर यातील टोळीची साखळी समोर आली असून आत्तापर्यंत याप्रकरणी आठजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मांडूळ सर्पासह एक दुचाकी व 7 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत वनविभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी, वनविभागाच्या तपास पथकाने 16 रोजी आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावाच्या हद्दीमध्ये कारगणी रोड लगत सापळा रचून दोन इसमांना मांडूळ या सर्पाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना मांडूळ सर्पासह रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली. या दोन आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर टोळीतील तानाजी मारुती चव्हाण (वय 50, रा. चिनके ता. सांगोला), शिवाजी सोपान बनसोडे (वय 51, रा. नाझरे, ता. सांगोला), शाहरुख ऊर्फ नयन दावल सुभेदार (वय 25, रा. जवळा, ता. सांगोला), सलीम हुसेन मुजावर (वय 25, रा. इस्लामपूर  ता. वाळवा),       कुमार राजाराम ढोबळे (वय 26, रा. इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली),       प्रितम सतिश पवार (वय 24, रा. इस्लामपूर, ता. वाळवा), प्रवीण उर्फ अमोल सुबराव (वय 25, रा. लेंगरे, ता. खानापूर), संजय ज्ञानू जाधव (वय 28, रा. लेंगर, ता. खानापूर जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.             

सदर आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व जैव विविधता कायदा 2002 नुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपींची वनकोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, जामीन नाकारून न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. ही कारवाई सांगलीचे सहाय्यक वनसंरक्षक गजानन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुप्रिया शिरागावे, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, सांगलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार सुहास पवार, राजेश वीरकर व वाहनचालक दिनेश नेहरकर, फिरते पथक  स्टाफ कोल्हापूर, सांगली यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Related posts: