दारुमुक्त जावलीत रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक

वार्ताहर/ कुडाळ
दारू हद्दपार झालेल्या जावली तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक सायगाव ग्रामस्थांनी उघडकीस आणली. मेढा पोलिसांनी त्या रुग्णवाहिकेची पाहणी करुन अवैध दारूची वाहतूक करत असताना सातारा येथील विजय रमेश देशमुख (वय 36 रा. रामाचा गोट मंगळवार पेठ) व संतोष अशोक पवार (वय 30 रा. न्यू विकासनगर) या दोघांना सायगाव ग्रामस्थांच्या मदतीने अवैध दारू वाहतूक करत असताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मेढा पोलिसांनी रुग्णवाहिकेसह दोन आरोपी यांना अटक करून एक लाख 92 हजार 754 रुपयाचा दारु मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूचे अमिष दाखवून मतदारांना भुलवण्यासाठी होत असलेला प्रयत्न सायगाव ग्रामस्थांनी हाणून पाडल्यामुळे सोशल मीडियावर याचे कौतुक होत आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावळी तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून रुग्णवाहिकेमध्ये हे अवैधरित्या दारू वाहतूक होत असल्याचा संशय सायगाव येथील ग्रामस्थांना आला होता याच धर्तीवर सायगाव ग्रामस्थांनी गावामध्ये रात्री एकच्या सुमारास या रुग्णवाहिकेला अडवले व रुग्णवाहिकेमध्ये तपासणी केली असता रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाऐवजी दारूचे बॉक्स आढळले. या दारूच्या बॉक्समध्ये देशी-विदेशी असे एकूण 90 हजार रुपयांचा दारू मुद्देमाल ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर येथील गावातील लोकांनी मेढा पोलिसांना संपर्क साधला घटनास्थळावर तत्काळ मेढा पोलीस स्थानकाचे निळकंठ राठोड व पोलीस फौजफाटा दाखल झाला. व रुग्णवाहिकेमध्ये असणारा दारू मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत दोन आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्यादिवशीच जावळी तालुक्यात दारूबंदीच्या तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतूक झाल्यामुळे या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. दोन जणांवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारू वाहतूक रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकूणच मतदानाच्या पूर्वसंध्येला जिह्यात मतदारांना भुलवण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, पोलीस प्रशासनानेही जिह्यातील लोकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सातारा पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.